म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 01:30 PM2024-10-07T13:30:52+5:302024-10-07T13:34:44+5:30
वृद्धांना इस्रायली मशिनच्या साहाय्याने तरुण बनवण्याचं खोटं सांगून लोकांची ३५ कोटींची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कानपूरमध्ये वृद्धांना इस्रायली मशिनच्या साहाय्याने तरुण बनवण्याचं खोटं सांगून लोकांची ३५ कोटींची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जोडप्याने मोठ्या प्रमाणात लोकांना गंडवलं आणि बॉलिवूड कलाकारांच्या फिटनेसचं देखील उदाहरण दिलं. आरोपी पती-पत्नी लोकांना सांगत होते की, चित्रपटातील कलाकार याच मशीनद्वारे थेरपी घेत असल्याने ते फिट राहतात.
जोडप्याने लोकांना तरुण बनवण्याचा फॉर्म्युला विकून ३५ कोटी रुपयांची फसवणूक केली आणि आपली फसवणूक झाल्याचं लोकांच्या लक्षात येईपर्यंत पती-पत्नी दोघंही फरार झाले होते. या जोडप्याने अनेक प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटींचं नाव सांगून ते इस्रायली मशीनमधून थेरपी घेऊन तरुण बनले आहेत असं सांगितलं. त्यामुळे लोक त्यांच्या जाळ्यात अडकून फसवणुकीचे बळी ठरले.
सुनील बाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते जेव्हा या जोडप्याला भेटायला गेले तेव्हा जोडपं म्हणालं की, तुम्हा लोकांना या मशीनची किंमत का समजत नाही? अमिताभ बच्चन, शाहरुख खान नेहमी या मशीनची मदत घेऊन तंदुरुस्त राहतात. तुमचा नंबर आत्ताच या मशीनमध्ये बुक करा, नाहीतर भविष्यात खूप लोक असतील. वेटींग असेल आणि दोन वर्षे लागतील. त्यांच्या जाळ्यात अडकून मी माझे पैसे गुंतवले आणि आता दोघंही सापडत नाहीत असंही सुनील यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणाचा तपास करत असलेले किडवई नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी बहादुर सिंह सांगतात की, आतापर्यंत अनेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. लोक तक्रारी करत आहेत आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या जात आहेत. इस्त्रायली मशीन ज्या इमारतीत बसवण्यात आली होती ती इमारत सील करण्यात आली आहे. आरोपींचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी मशीन सेंटरची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर ते सील करण्यात आलं आहे.