कुटुंबाने ज्या व्यक्तीला मृत समजून दफन केले ‘तो’ पुन्हा जिवंत परतला; पोलिसांनाही बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 02:01 PM2020-08-09T14:01:58+5:302020-08-09T14:02:35+5:30
चमनंगज येथील रहिवाशी अहमद हसन हे पत्नी नगमा आणि दोन मुलांसह राहतात. अहमद हे एसी रिपेरिंगचं काम करतात
कानपूर – कर्नलगंज परिसरात ५ ऑगस्टला मिळालेल्या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलीस आणि नातेवाईकांचा फज्जा उडाला आहे. ज्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यात आला तो शुक्रवारी रात्री उशीरा घरी परतला, कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा उघडल्यानंतर समोर त्या व्यक्तीला पाहून थक्क झाले. पोलीस आता या प्रकरणाचा पुन्हा तपास करत आहे.
चमनंगज येथील रहिवाशी अहमद हसन हे पत्नी नगमा आणि दोन मुलांसह राहतात. अहमद हे एसी रिपेरिंगचं काम करतात. २ ऑगस्ट रोजी अहमद आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं, त्या रागात ते घरातून बाहेर पडले. त्यानंतर घरी परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. ५ ऑगस्ट रोजी पोलिसांना चकेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी अहमद हसनच्या घरच्यांना बोलावलं. त्यांनीही मृतदेह अहमद हसन यांचाच असल्याचं सांगितले.
या मृतदेहाच्या पोस्टमोर्टमनंतर पोलिसांनी आणि नातेवाईकांना मृतदेह दफन केला. शुक्रवारी रात्री अहमद हसन जेव्हा घरी पोहचले तेव्हा नातेवाईकांना धक्काच बसला. नातेवाईकांना अहमद हसन यांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितल्यानंतर अहमद आणि नातेवाईकांना पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे पोलिसही हैराण झाले. त्यामुळे अहमद समजून ज्या व्यक्तीचा मृतदेह दफन केला तो व्यक्ती कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत.
हा बेवारस मृतदेह कोणाचा आहे? त्याचा मृत्यू कसा झाला. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल. सर्व तथ्य कोर्टासमोर ठेवल्यानंतर मजिस्ट्रेटच्या देखरेखीखाली मृतदेह कबरीमधून बाहेर काढण्यात येईल. मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले आहे.