“ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...”सुसाईड नोटमध्ये लिहून युवकाची आत्महत्या; कारण ऐकून धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:11 PM2021-06-15T20:11:45+5:302021-06-15T20:12:47+5:30
युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती
कानपूर - ये रातें, ये मौसम, नदी का किनारा...हे गाणं लिहून एका युवकाने आत्महत्या केली आहे. या युवकाचा मृतदेह तीन दिवसानंतर रुममध्ये आढळला. सोमवारी रात्री घरात दुर्गंध पसरला तेव्हा घरमालकाने पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.
युवकाने सुसाईड नोटमध्ये मार्मिक गाणं लिहिलं आहे. माहितीनुसार, मृतकासोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाली होती. त्यात त्याला ९ लाखांचा चुना लागला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड मानसिक तणावाखाली होता. लखनौच्या बालागंजच्या आझाद नगरमधील यतींद्र कानपूरच्या हा सत्यम विहारमध्ये रुम भाड्याने घेऊन तेथे वास्तव्यास होता. यतींद्रच्या कुटुंबात पत्नी आणि ५ महिन्याचा मुलगा आहे. यतींद्रची पत्नी एक आठवड्यापूर्वी लखनौला गेली होती.
रुममधून येत होता दुर्गंध
बँकेत कर्मचारी असलेल्या घरमालक अमित यांनी सांगितले की, यतींद्रच्या रुमबाहेरील दरवाजा मागील शनिवारपासून बंद होता. शनिवारनंतर यतींद्रला बाहेर बघितलं नाही. सोमवारी त्याच्या रुममधून खूप दुर्गंध येत होता. दरवाजा वाजवला परंतु आतमधून काहीही आवाज आला नाही. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतला. यतींद्रचा मृतदेह जमिनीवर पडला होता. घटनास्थळी २ पानांची सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमला मृत व्यक्तीच्या गळ्याभोवती फास आढळला. दावा केला जातोय की, यतींद्र बेडवर खुर्ची ठेऊन पंख्याला लटकला होता. परंतु गाठ सुटल्याने फास निघाला आणि त्याचा मृतदेह जमिनीवर पडला होता.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
यतींद्रने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये सुरुवातीला ये रातें, ये मौसम, नदी का किनारा असं लिहून पुढे म्हटलंय की, राजकिशोरने नोकरी देण्याच्या बहाण्याने ३ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्याची पत्नी मायानेही मला फसवून ३ लाख रुपये घेतले होते. राजकिशोरने एका साथीदाराच्या मदतीनं कल्याण विभागात नोकरी देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले. यतींद्रनं पुढे लिहिलंय की, मी माझा मित्र सुरज गंगवार याला ५ हजार रुपये उधार दिले होते. उधारीचे पैसे न देता त्याच्या घरातील पोलिसांची भीती दाखवत होता असं पोलीस तपासात समोर आलं आहे.