कंसास शुटींग : भारतीय अभियंत्याची हत्या करणाऱ्यास तीन वेळा जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 10:56 AM2018-08-08T10:56:28+5:302018-08-08T10:59:09+5:30
माजी नौसैनिकाला पुढील 60 वर्षे तुरुंगात घालवावी लागणार
न्यूयॉर्क : दहशतवादी असल्याचे म्हणत वर्णद्वेशावरून गेल्या वर्षी भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोटला याची गोळी झाडून हत्या करणाऱ्या अमेरिकेच्या माजी नौसैनिकाला तीन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅडम पुरिन्टन (53) असे या माथेफिरु आरोपीचे नाव असून त्याला पुढील 60 वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहेत.
फेब्रुवारी, 2017 मध्ये 32 वर्षीय श्रीनिवास कुचीभोटला याच्यासह त्याचा भारतीय वंशाचा मित्र आलोक मदसानी आणि कंसासचा रहिवासी इयान ग्रिलॉट हे ऑस्टिन बार मध्ये गेले होते. तेव्हा आरोपी अॅडम याने श्रीनिवास याला दहशतवादी संबोधून शिवीगाळ करत गोळ्या झाडून हत्या केली होती. यात त्याचे दोन्ही मित्र जखमी झाले होते.
अमेरिकेच्या न्यायालयाने आज, बुधवारी अॅडम पुरिन्टन याला तीन वेळा जन्मठेप सुनावली आहे. न्यायाधीश जेफ सेसन्स यांनी सांगितले की, हा खुपच घृणास्पद प्रकार आहे, अशा माणसाला बाहेर उजळ माथ्याने फिरण्याचा कोणताही अधिकार नाही.
याआधी प्रकरणाच्या सुनावणीवेळी अॅडम याने आपण श्रीनिवास कुचीभोटला आणि त्याच्या मित्रांवर वर्णद्वेशावरून हल्ला केल्याचे कबूल केले होते. अमेरिकेमध्ये हत्येच्या गुन्ह्यात 20 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.