ज्योतिषी महिलेवरील बलात्कारप्रकरणी टीव्ही अभिनेता करण ओबेरॉयला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:19 AM2019-05-07T07:19:45+5:302019-05-07T07:20:01+5:30
ज्योतिषी असलेल्या ३८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याच्यावर करण्यात आला आहे.
मुंबई : ज्योतिषी असलेल्या ३८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप टेलिव्हिजन कलाकार तसेच अँकर करणसिंह भूपेंद्रसिंह ओबेरॉय (४७) याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत रविवारी त्याला अटक केली आहे.
तक्रारदार महिला तिची आई, मावशी आणि मुलासोबत ओशिवरा परिसरात राहते. ती घरीच ज्योतिष पाहण्याचे काम करते. २०१६ मध्ये टिंडर या डेटिंग अॅपमार्फत त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे वाढले आणि ओशिवराच्या यमुनानगर परिसरात दोघे एकमेकांना भेटले. करणचे तिच्याकडे येणेजाणे वाढले. २०१७ मध्ये ओबेरॉय पीडितेच्या घरी गेला. त्या ठिकाणी तिला प्रसाद म्हणून खोबरे दिले. त्यानंतर गोड बोलून तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर बलात्कार केला. याचे त्याने मोबाइलवर व्हिडीओ शूट केल्याचे तिने ओशिवरा पोलिसांना सांगितले. तसेच या व्हिडीओचा वापर करून तो तिच्याकडून शारीरिक सुखाची मागणी करायचा. तसेच तिच्याकडून बरेच पैसेही त्याने उकळले. त्यानंतर व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तिला तो त्याच्याशी लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. २०१८ मध्येदेखील परत देण्याचे वचन देत ओबेरॉयने तिच्याकडून अडीच लाख उकळले. मात्र ते तिला परत केले नाहीत. या पैशांच्या बदल्यात व्हिडीओ डिलीट करण्याची कबुली त्याने दिली होती. मात्र तेदेखील त्याने केले नाही, त्यामुळे कंटाळून पोलिसांकडे धाव घेतल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी शहानिशा करत ओबेरॉयला अटक केली. त्याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जस्सी जैसी कोई नहीं, स्वाभिमान, छाया, निर्देश, जीवन बदल सकता है, हादसा, इनसाइड एज, रॉसवेल, न्यू मेक्सिको या मालिकांमध्ये ओबेरॉयने काम केले आहे. तसेच टायटन अंताक्षरी आणि द ग्रेट इंडियन कॉमेडी शो या रिअॅलिटी शोसाठी त्याने अँकरिंगदेखील केले आहे.