करण परोपटे हत्याकांड : पोलिसांच्या चुकीमुळे कुख्यात आरोपींना जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:51 PM2021-10-01T16:51:45+5:302021-10-01T16:54:16+5:30
Crime News : नव्वद दिवस उलटूनही दोषारोपपत्र सादर केलेच नाही
यवतमाळ: यवतमाळातील स्टेट बँक चौक परिसरात कुख्यात अक्षय राठोड टोळीने त्याचा जावई करण परोपटे यांची गोळ्या झाडून हत्या केली. सायंकाळी वर्दळीच्या वेळेस हे हत्याकांड घडले. यात पोलिसांनी दहा जणांना अटक केली मात्र नंतर गुन्ह्याचा तपास वेळेत केला नाही. न्यायालयात दोषारोपपत्र नव्वद दिवसात सादर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने सहा कुख्यात आरोपींना जामीन मंजूर केला.
अक्षय राठोड टोळीने बाभुळगाव तालुक्यातील वर्धा नदी काठावर रेतीचे साम्राज्य उभे केले. वर्चस्वाच्या लढाईतून अक्षय राठोड याने स्वतःच्याच बहीण जावयाचा खून घडवून आणला मोक्का अंतर्गत अक्षय राठोड औरंगाबाद कारागृहात असताना त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने करण परोपटे याची हत्या घडवून आणली अशी तक्रार करणची पत्नी तथा अक्षय राठोडच्या बहिणीने पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली. अक्षय टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. यवतमाळच्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला. दरम्यान अक्षय गॅंग विरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र या गडबडीत ९० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलीस विसरले याचाच फायदा कुख्यात आरोपींना मिळाला. आरोपींनी ९० दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर २३ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत कुठली हालचाल केली नाही. मात्र नंतर थेट अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. आरोपींच्या वकिलांनी दमदार युक्तिवाद केला यामुळे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.
पोलीस आरोपींविरोधात मोक्काची प्रक्रिया करत असताना न्यायालयाकडे रीतसर अर्ज करून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढवून मागणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया नियमानुसार झालीच नाही. नेमके याच चुकीचा फायदा आरोपींना मिळाला त्यांना तीन महिने पूर्ण होताच गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर झाला. सर्वांसमक्ष हे हत्याकांड घडले शिवाय गोळीबारात एक हॉटेल व्यवसायिक ही जखमी झाला होता. भक्कम पुरावे हातात असताना पोलिसांच्या चुकीमुळे आशिष उर्फ बगीरा रमेश दांडेकर, शुभम हरिप्रसाद बघेल, दिनेश उर्फ अमित मधुकर तूर्काने, धिरज उर्फ बँड सुनील मैद, ऋषिकेश उर्फ रघु दिवाकर रोकडे, प्रवीण उर्फ पिके कवडू केराम हे आरोपी कारागृहाबाहेर आले आहेत. गंभीर बाब म्हणजे मोक्का अंतर्गत औरंगाबाद कारागृहात असलेला मास्टर माईंड अक्षय राठोड यालासुद्धा प्रोडूस वारंटवर पोलिसांनी करण हत्याकांडात चौकशीसाठी ताब्यात घेतले नाही. या प्रकरणात पोलिसांच्या अनेक चुका होत गेल्या यामुळेच गंभीर गुन्हे शिरावर असलेले आरोपी कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला.