धक्कादायक! शिक्षकाने विद्यार्थ्याला आधी मारहाण केली नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:28 PM2022-12-19T22:28:31+5:302022-12-19T22:29:21+5:30
या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भरत असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.
कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका विद्यार्थ्याला सरकारी शाळेतील शिक्षकाने बेदम मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून फेकून दिले. त्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेतील शिक्षक मुथप्पा यांनी पहिल्यांदा १० वर्षीय विद्यार्थ्याला फावडे मारले. त्यानंतर त्याला बाल्कनीतून फेकून दिले. या घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. भरत असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता.
गडक जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, शिक्षकाने केलेल्या या कृत्यामागे कौटुंबिक वाद असण्याची शक्यता आहे. आरोपी शिक्षक मुथप्पाने याच शाळेत शिक्षिका असलेल्या भरतची आई गीता बारकर यांनाही मारहाण केली होती. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी मुथप्पा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
गेल्या आठवड्यात दिल्लीतील एका शाळेतून अशीच एक घटना समोर आली होती. रागाच्या भरात शिक्षिकेने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीवर कात्रीने हल्ला केला आणि तिला सरकारी शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकून दिले. ही विद्यार्थिनी दिल्लीच्या मॉडेल बस्ती येथे असलेल्या दिल्ली महानगरपालिकेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी होती. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी सांगितले होते की, त्यांची मुलगी बोलू शकत नाही आणि खाऊ शकत नाही.
वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला होता
याप्रकरणी वडिलांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्याने आपण रोजंदारी मजूर असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी त्यांना मुलीच्या घटनेची माहिती देण्यात आली. शाळेकडून हल्ल्याची माहिती मिळाली, तेव्हा मी कामावर होतो असे ते म्हणाले. शाळेत पोहोचल्यावर त्यांना सांगण्यात आले की, मुलीला हिंदुराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.