धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:14 PM2024-05-15T17:14:24+5:302024-05-15T17:15:07+5:30
Karnataka Crime News: या तरुणाने याआधी तरुणीला धमकी दिली होती की, जर तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही, तर तिचे हाल नेहा हिरेमठ सारखे होतील.
Spurned in Love, Youth Stabs Girl to Death हुबळी : कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हुबळी शहरात बुधवारी पहाटे २३ वर्षीय संतप्त प्रियकर तरुणाने २१ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिची हत्या केल्याची घटना घडली. या तरुणाने याआधी तरुणीला धमकी दिली होती की, जर तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही, तर तिचे हाल नेहा हिरेमठ सारखे होतील. दरम्यान, नेहा हिरेमठ हिची नुकतीच हुबळी येथील कॉलेज कॅम्पसमध्ये क्रूरपणे चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बुधवारी पहाटे ५.३० वाजता तरुणीच्या घरात घुसला. यानंतर ती झोपली असताना तिच्यावर जीवघणा हल्ला केला. यावेळी कुटुंबातील इतर सदस्य तेथे आले आणि त्यांनी आरोपीला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, तरीही त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. एवढेच नाही तर गुन्हा केल्यानंतर तो पळून जाण्यात यशस्वी झाला. ही घटना बेंडीगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरपुरा ओणी परिसरात घडली.
मृत तरुणीचे नाव अंजली अंबिगेरा असे आहे, तर मारेकऱ्याचे नाव विश्वा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, त्याला गिरीश नावाने सुद्धा ओळखले जाते. याशिवाय, आरोपीचे तरुणीवर प्रेम असल्याचा दावा केला जात आहे. सध्या मारेकरी विश्वा हा फरार आहे. दरम्यान, नेहा हिरेमठ हत्येची आगही विझलेली नसताना खुनाच्या या नव्या घटनेने शहर हादरले आहे. काही दिवसांपूर्वी एमसीएची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिची शहरातील कॉलेज कॅम्पसमध्ये संतप्त प्रियकराने निर्घृण हत्या केली होती, यावरून बरेच राजकारण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंजलीला ब्लॅकमेल करत होता आणि तिच्या पालकांना न सांगता म्हैसूरला जाण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीचा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असून तो दुचाकी चोर म्हणूनही ओळखला जात असल्याचे समोर आले आहे. अंजलीची आजी गंगाम्मा यांनी यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधून आरोपींकडून येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली होती. मात्र, पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि त्यांना जास्त काळजी करू नका, असा सल्ला दिला. सध्या पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.