कूकर बॉम्बने इतरांना उडवायला गेला अन् स्वतःच उडाला; मंगळुरू स्फोटात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:03 PM2022-11-21T19:03:18+5:302022-11-21T19:03:29+5:30
आरोपी मोहम्मद शारिकने हिंदू नावाने आधार कार्ड बनवले, त्याच्यावर इसिसचा मोठा प्रभाव होता.
मंगळुरू: कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये शनिवारी झालेल्या ऑटो बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शारिक हा 'कूकर बॉम्ब' घेऊन ऑटोमध्ये प्रवासी म्हणून बसला होता. शहरातील गजबजलेला परिसरात स्फोड घडवून आणण्याचे त्याचे लक्ष्य होते. सुदैवाने ऑटोमध्येच बॉम्बचा स्फोट झाला आणि शारिक स्वत: त्याचा बळी गेला. या घटनेत तो 40 टक्के भाजला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शनिवारी मंगळुरुमध्ये एका ऑटोत स्फोट झाला होता. या स्फोटात आरोपी मोहम्मद शारिक गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीवर दहशतवादी संघटना इसिसचा मोठा प्रभाव होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो हिंदू नावाने वावरत असे. त्याने हिंदू नावाचे आधार कार्डही तयार करुन घेतले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शारिकने एक कूकर बॉम्ब तयार केला होता. त्याला नागौरी भागात स्फोट घडवून आणायचा होता. तो ऑटोमधून पंपवेल परिसरात जात असताना अचानक ऑटोतच बॉम्बस्फोट झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आरोपी शारिक गंभीररित्या भाजला गेला. या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्याने घेतले असून, प्रत्येक अँगलने तपास सुरू आहे.