मोबाईल तोडल्याचा बदला! पतीच्या फोनवरून पत्नीने पोलिसांना दिली बॉम्बस्फोटाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 05:09 PM2023-12-07T17:09:03+5:302023-12-07T17:15:15+5:30

पतीचा बदला घेण्यासाठी एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याला धमकीचा बनावट मेसेज पाठवला.

karnataka woman booked for sending hoax bomb threat sms to police to get back at husband | मोबाईल तोडल्याचा बदला! पतीच्या फोनवरून पत्नीने पोलिसांना दिली बॉम्बस्फोटाची धमकी

मोबाईल तोडल्याचा बदला! पतीच्या फोनवरून पत्नीने पोलिसांना दिली बॉम्बस्फोटाची धमकी

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीचा बदला घेण्यासाठी एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याला धमकीचा बनावट मेसेज पाठवला. तपासात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी 32 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला इतर पुरुषांशी ऑनलाईन बोलायची. हा प्रकार कळताच महिलेच्या पतीने रागाच्या भरात तिचा फोन तोडला. यामुळे महिला संतप्त झाली. ही गोष्ट तिने बिहारचा रहिवासी असलेल्या तिच्या मित्राला सांगितल्यावर त्याने आणखी एका मित्रासोबत मिळून महिलेच्या पतीला अडकवण्याचा कट रचला.

महिलेला दुसरा फोन मिळाल्यावर तिच्या मित्राने तिला बॉम्बची धमकी देणारा बनावट मेसेज पाठवला आणि तिच्या पतीच्या फोनवरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला हा मेसेज पाठवण्याची सूचना केली.

महिलेनेही तेच केलं आणि 3 डिसेंबर रोजी तिच्या पतीच्या फोनवरून पोलीस अधिकाऱ्याला बॉम्बची खोटी माहिती देणारा मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये एकामागून एक आरडीएक्स बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पतीच्या फोनवरून हा मेसेज पाठवल्यानंतर महिलेने तो डिलीट केला.

अधिकाऱ्याच्या फोनवर मेसेज येताच भीतीचं वातावरण पसरलं. फोनचं लोकेशन तातडीने ट्रॅक करून महिलेच्या पतीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांना संशय आल्याने महिलेची चौकशी केली असता तिने फोन तोडल्याचा बदला घेण्यासाठी हा खोटा मेसेज पाठवल्याची कबुली दिली.

पोलिसांनी यानंतर धमकीचा मेसेज पाठवण्याची कल्पना देणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

Web Title: karnataka woman booked for sending hoax bomb threat sms to police to get back at husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.