करणी सेना आक्रमक; सलमानच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 06:55 PM2019-10-11T18:55:20+5:302019-10-11T18:57:25+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मुंबई - बिग बॉस - १३ शो बंद करण्यावरून करणी सेना आक्रमक झाली असून त्यांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज आंदोलन केले आहे. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव करणी सेनेच्या धमकीनंतर पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
यंदा बिग बॉसमध्ये बेस्ट फ्रेंड्स फॉरेव्हर (BFF) ही नवी संकल्पना मांडण्यात आली. यात सर्व स्पर्धकांना त्यांच्या जोड्या निवडण्यास सांगण्यात आले. या जोड्या एकाच बेडवर झोपणार असून यात काही महिला स्पर्धकांनी पुरुष स्पर्धकाला जोडीदार म्हणून निवडले आहे. त्यानुसार काश्मिरी मुलाबरोबर हिंदू मुलगी बेड शेअर करीत आहे. त्यामुळेच हिंदू मुलींना आधुनिक बनवण्याच्या नावाखाली चुकीची मानसिकता पसरविली जात असल्याने करणी सेना आक्रमक झाली असून या सेनेने आक्षेप घेत हा शो बंद करण्याची मागणी केली आहे.
बिग बॉस - १३ शो सुरू होऊन आता अवघे २ आठवडे झाले आहेत. हा शो बंद करण्याबाबत करणी सेनेने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पत्रात हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. या शो च्या माध्यमातून लव्ह जिहाद पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात प्रयत्न सलमान करत असून शो बंद न केल्यास शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा करणी सेनेने दिला होता. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासून सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली आहे.
मुंबई - बिग बॉस - १३ शो बंद करण्यावरून करणी सेना आक्रमक; अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर केले आंदोलन https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 11, 2019