मुंबईत कारटेप चोरांचा हैदोस, एका अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 06:09 PM2018-10-02T18:09:13+5:302018-10-02T18:09:44+5:30
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून कारटेपचोरांनी हैदोस घातला आहे. शहर आणि उपनगरात पार्क करण्यात आलेल्या मोटारकार फोडून त्यातून टेप चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला त्याच्या साथीदारासह ताडदेव पोलिसांनी अटक केली. मालवणीमध्ये पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही या चोरट्यांनी धक्काबुकी केली. या झटापटीत पोलीस अधिकारी जखमी झाले.
दक्षिण मुंबईसह उपनगरात कारटेप चोरांनी हैदोस घातला होता. अनेक बड्या व्यक्तीच्या गाड्यांमधील टेप चोरीला गेल्यामुळे विविध पोलीस ठाण्याची पथके या चोरांच्या मागावर होती. ताडदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतही कारटेप चोरीला गेल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक अरुण थोरात, उपनिरीक्षक पडवाळे यांच्यासह त्यांच्या पथकाने कारटेप चोरांचा शोध सुरु केला. मुंबईत ठिकठिकाणी पन्नासहून अधिक कारटेप चोरीचे गुन्हे दाखल असलेला राजेश प्रकाश चव्हाण हा यातील मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून राजेश मालवणी येथील पारधीवाडा येथे राहत असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. संधी मिळताच पोलिस राजेशच्या घरात घुसले. अचानक पोलिसांची धाड पडल्यामुळे बिथरलेल्या राजेशने पोलिसांना धक्कबुकी करून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. या झटापटीत सहायक निरीक्षक अरुण थोरात यांच्या पायाला दुखापत झाली. राजेश याला पकडल्यानंतर त्याचा साथीदार मनोज यादव यालाही पोलिसांनी पकडले.
संपूर्ण मुंबईत गुन्हे
राजेश याच्यावर संपूर्ण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे आहेत. ४५ गुन्ह्यात राजेश शिक्षा भोगून बाहेर आला आहे. मलबार हिल, डोंगरी, शिवाजी पार्क, गावदेवी, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यासह पश्चिम द्रुतगती महामार्गनजीक असलेल्या पोलिस ठाण्यात गुन्हे आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.