कासारवडवली पोलिसांकडून सराईत सोनसाखळी चोरटे जेरबंद, चार लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 07:10 PM2020-11-29T19:10:06+5:302020-11-29T19:10:36+5:30
Crime News : या दुकलीतील अन्य एका साथीदाराचा शोध घेत, असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली.
ठाणे : गेल्या सप्टेंबरला कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनाने येवून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना त्या वाहनाचा शोध घेवून एका दुकलीला ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी केली असता, तीन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जबरी चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा चार लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या दुकलीतील अन्य एका साथीदाराचा शोध घेत, असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी रविवारी दिली. आरोपी तबरेज मोहम्मद अली खान (२७) व अबुतला अजीम खान (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत. कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथील उन्नती वूड्स सोसायटीत ४ सप्टेंबर रोजी एक महिला पायी जात असताना, चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरी केल्याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा प्रकार पाहता यातील अनोळखी आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करणे कामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, यांनी पोलीस पथकास सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा शोध घेऊन तबरेज मोहम्मद अली खान व अबुतला अजीम खान या दोघांना अटक करण्यात आली.
यावेळी आरोपींकडून कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. जबरी चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा चार लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या अन्य एका साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.