Video : खाकीतली माणुसकी! पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचले ज्येष्ठ नागरिकाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 02:29 PM2018-12-04T14:29:46+5:302018-12-04T14:33:06+5:30
वेळ न दवडता लागलीच पवने यांनी आजोबांना खांद्यावर मारून रेल्वे स्थानकाबाहेरील ॲब्युलन्स गाठली आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या मदतीने त्यांना सायं रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आजोबांचा जीव वाचला.
मुंबई - दादर रेल्वे स्थानक म्हणजे गर्दीच ठिकाण. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा झटका आलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस शिपायाने चक्क खांद्यावर उचलून ॲब्युलन्सपर्यंत नेले. म्हणून तात्काळ केलेल्या मदतीमुळे तुकाराम गोळे (वय ६५) यांना होणार धोका टळला आहे. खाकीतली माणुसकी दाखवणारी ही घटना २९ नोव्हेंबरला घडली आहे.
२९ नोव्हेंबरला दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ८ वर ५. २० ते ७. २० वाजताच्या दरम्यान दादर रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्तव्यावर असलेल्या १५ पोलीस कर्मचारी यांच्यासह व्हिजिबल तपासणी करत असताना सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर गस्त घालण्यासाठी गेले असताना सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने महिलांच्या डब्ब्यासमोर एका ज्येष्ठ नागरिकांच्या छातीत दुखत असल्याने चक्कर येऊन पडले होते. कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस शिपाई पवने यांनी ज्येष्ठ नागरिकाकडे चौकशी केली असता तब्येत बिघडल्याबाबत सांगितले आणि खूप त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. ज्येष्ठ नागरिकाचे नाव तुकाराम गोळे (वय ६५) असून मदतीला धावून आलेले पोलीस शिपाई हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. वेळ न दवडता लागलीच भरगर्दीत पवने यांनी आजोबांना खांद्यावर मारून रेल्वे स्थानकाबाहेरील ॲब्युलन्स गाठली आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या मदतीने त्यांना सायं रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आजोबांचा जीव वाचला.