गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी! पोलीस अधिक्षकांकडून दखल; कर्मचाऱ्याचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 13:20 IST2021-09-17T13:18:55+5:302021-09-17T13:20:28+5:30
Police News : गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गणेशभक्तांच्या मदतीला धावली खाकी वर्दी! पोलीस अधिक्षकांकडून दखल; कर्मचाऱ्याचा सत्कार
सांगली : कोरोनाचे वातावरण नियंत्रणात येत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात उत्साह कायम आहे. याच कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह नागरिकांच्या सोयीसाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस कार्यरत आहेत. विसर्जनावेळी अशाच कार्यरत कर्मचाऱ्याने खाकीचा रूबाब बाजूला सारत सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. आणि कर्मचाऱ्याचे काम पाहून अधीक्षक दिक्षित गेडाम यांनीही त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
गणेश विसर्जनामुळे शहरातील प्रमुख मार्गावर आणि विशेषत: नदीकाठावर मोठी गर्दी असते. अशावेळी वाहतूक नियोजनासह गर्दी होणार नाही यासाठी यंदा सर्वच ‘स्पॉट’वर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे कर्मचारीही त्याठिकाणी कार्यरत असतात. गुरूवारी विसर्जनाच्या सातव्या दिवशी सरकारी घाट परिसरात वाहतूक पोलीस निखील जाधव कर्तव्यावर होते. नेमके याचवेळी एक कुटूंब दुचाकीवरून गणेशमुर्ती घेऊन विसर्जनासाठी आले. दुचाकीवर महिलेच्या हातात मुर्ती तर पुढे लहान बाळ...त्यामुळे त्या कुटूंबाची अडचण झाली. दुचाकीवरून उतरायचे तर मुर्ती सावरायला कोणीतरी हवे. आणि एकूणच गर्दीमुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नव्हते. मुर्ती हातातच असल्याने ती खाली ठेवून उतरणे धोक्याचे होते. नेमकी हीच अडचण ओळखून जाधव यांनी त्या कुटूंबाजवळ जात ती मुर्ती घेत त्यांना वाहन बाजूला लावण्यात मदत केली शिवाय त्या कुटूंबाला सहकार्यही केले. वाहतूक पोलिसाच्या या मदतीमुळे भारावलेल्या कुटूंबाने त्यांचे विशेष आभार मानले. नियमीत वाहतूक नियोजनाच्या कामाव्यतिरिक्त जाधव यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची अधीक्षक गेडाम यांनीही दखल घेत निखील जाधव यांचा पुष्पगुच्छ देत गौरव केला व खाकीच्या पलिकडे जावून केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी वाहतूक शाखेच्या सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख उपस्थित होत्या.