खार हत्याप्रकरण : जान्हवी कुकरेजाच्या आरोपपत्रात त्रुटी, आरोपी जोगधनकरच्या वकिलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:38 AM2021-04-01T03:38:41+5:302021-04-01T03:39:07+5:30
जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला
मुंबई : जान्हवी कुकरेजा (वय १९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांनी अडीचशे पानी आरोपपत्र मंगळवारी (दि. ३०) कोर्टात दाखल केले. मात्र यात बऱ्याच त्रुटी असल्याचा दावा आरोपी असलेल्या श्री जाेगधनकर याच्या वकिलांकडून करण्यात आला असून, त्यामुळे पीडितेला खरा न्याय मिळणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
खार पोलिसांनी घटनेच्या तीन महिन्यांनंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, भगवती हाईट्स इमारतीच्या १४व्या मजल्यावर २० जण पार्टी करीत होते. ज्यात सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने १२ जणांचे जबाब नोंदविण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टर, न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ यांचाही जबाब नाेंदविण्यात आला. जान्हवीच्या अंगावर ४८ जखमा आढळल्याचा उल्लेख आहे.
मात्र श्री जोगधनकर याचे वकील ॲड. महेश वासवानी यांच्या म्हणण्यानुसार श्री याच्या पाठीच्या कण्याला दुखापत आहे; तसेच डोक्यालाही आठ इंचांची जखम आहे, जी एखादी बॉटल डोक्यावर फोडल्यामुळे झाल्याचा संशय आहे. ही जखम त्याला त्या दोन मुली (जान्हवी, दिया) यांनी मारहाण केल्यामुळे होऊ शकत नाही.
तर, पोलिसांनी ज्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या, त्यानुसार दारू पिणाऱ्या सर्व जणांचे जबाब नोंदविण्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात चौथ्याच व्यक्तीचा हात असून त्यानुसार सर्व वैद्यकीय अहवालही पोलिसांनी कोर्टात सादर करणे आवश्यक आहे. मात्र तसे करण्यात आलेले नाही, असेही
ॲड. वासवानी यांचे म्हणणे आहे. पोलिसांची दिशाभूल होत असून, त्यानुसार त्यांनी चौकशी करावी, अशी मागणी करीत पीडितेला खरा न्याय मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.