खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:50 IST2025-03-25T09:48:36+5:302025-03-25T09:50:52+5:30

चुकीची औषधे देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे

Khushboo Thackeray death School principal, superintendent suspended Tribal Projects Department takes action | खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई

खुशबू ठाकरे मृत्यू: शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका निलंबित; आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पेण: शहरालगतच्या बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर वरवणे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि अधीक्षिका सुवर्णा वरगणे यांना निलंबित करण्यात आले आहे. अपर आयुक्तांच्या निर्देशानुसार एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभाग अधिकाऱ्यांनी नुकतीच ही कारवाई केली. चुकीचे निदान करून खुशबूवर चुकीची औषधी देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार, असाही प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबडी आदिवासी वाडीमध्ये राहणारी खुशबू नामदेव ठाकरे वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत चौथीत शिकत होती. तिला कुष्ठरोग झालेला नसतानाही तिच्यावर कुष्ठरोगाचे उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, खुशबूचा २२ जानेवारीला मृत्यू झाला. या औषधींच्या दुष्परिणामामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत याबाबत आदिवासी संघटनेतर्फे २४ फेब्रुवारीला पेण तालुका आमसभेत जोरदार आवाज उठविण्यात आला होता. 

कारवाईनंतर बदलली जबाबदारी

वरवणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून, ४१४ विद्यार्थी पटसंख्या आहे. कारवाईनंतर आता मुख्याध्यापक पदाची जबाबदारी माध्यमिक शिक्षिका माधवी मोरे यांच्यावर सोपविण्यात आली असून, अधीक्षिका म्हणून प्राथमिक शिक्षका ज्योती वाघ काम पाहतील, अशी माहिती आदिवासी प्रकल्प कार्यालय, पेण शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कुष्ठरोगी ठरवून उपचार

  • १६ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत खुशबूची तपासणी झाली. त्यात तिच्या अंगावरील तीन चट्ट्यांवरून ती कुष्ठरोगी असल्याचे निदान करण्यात आले. त्यानंतर १८ डिसेंबरपासून तिच्यावर उपचार सुरू झाले. त्यानंतर तिच्या अंगावर फोड आले व अंग सुजू लागले. 
  • मात्र, खुशबूवर कुष्ठरोगाचे उपचार सुरू केल्याचे तिच्या आई-वडिलांपासून लपविण्यात आले होते. पुढे तिची प्रकृती गंभीर झाल्याने कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्रथम तिच्या कुष्ठरोगाच्या गोळ्या बंद केल्या. मात्र, २२ जानेवारीला तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

Web Title: Khushboo Thackeray death School principal, superintendent suspended Tribal Projects Department takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.