दादर रेल्वे स्थानकात हरवलेला चिमुकला रेहान अवघ्या 15 मिनिटात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 11:47 PM2018-10-04T23:47:29+5:302018-10-04T23:48:16+5:30
कर्तव्यावर असलेले हवालदार गणेश नाईक आणि पोलीस शिपाई संदीप शेलार यांची नजर रडणाऱ्या रेहानवर पडली. त्यांनी रेहानकडे विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रसंग सांगितला.
मुंबई - गजबलेल्या दादर रेल्वे स्थानकात आज प्रवासादरम्यान मायलेकराची ताटातूट झाली. मात्र कर्तव्य दक्ष माटुंगा पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश नाईक आणि पोलीस शिपाई संदीप शेलार यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अवघ्या १५ मिनिटात मायलेकराची भेट घडवून आणता आली. आपला चिमुकला त्वरित भेटल्याने मुलाच्या आईने तसेच त्याच्या नातेवाईकांनी माटुंगा पोलिसांचे आभार मानले आहेत.
कुर्ला परिसरात राहणाऱ्या कादर कुटुंबातील साडेचार वर्षीय चिमुकला रेहान आज सकाळच्या सुमारास आई आणि आजोबांसोबत गोरेगाव येथे जात होता. गोरेगाव येथे जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात रेहान हा आई आणि आजोबांसह रेल्वेतून उतरला. दिवसरात्र गर्दी असलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरात रेहानचा हात सुटला आणि त्याची आईपासून ताटातूट झाली. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास आईपासून दुरावलेला रेहान दादर पूर्व स्थानकाबाहेर एकटाच रडत बसला होता. दरम्यान त्याचवेळी दुचाकीवरून गस्त घालणारे माटुंगा पोलीस ठाण्याच्या बिट क्र. १ च्या चौकीत कर्तव्यावर असलेले हवालदार गणेश नाईक आणि पोलीस शिपाई संदीप शेलार यांची नजर रडणाऱ्या रेहानवर पडली. त्यांनी रेहानकडे विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रसंग सांगितला.