पोलीस असल्याचे सांगून ठेकेदाराने अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 10:34 PM2020-08-19T22:34:02+5:302020-08-19T22:34:37+5:30
एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकरोड - जयभवानी रोडवरील वास्तुपार्क येथे राहणाऱ्या एका शासकीय ठेकेदारास दोघा संशयित गुन्हेगारांनी स्वतःला 'क्राईम ब्रँच पोलीस' असल्याचे भासवून गावठी पिस्तुलचा धाक दाखवत मोटारीत बळजबरीने बसवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान येथील एका लोकप्रतिनिधीच्या कार्यालयासमोर ठेकेदार शिलसिंह ओमप्रकाश नेहरा यांनी मोटार थांबविण्यास सांगितले असता, त्या अपहरणकर्ता तोतया पोलिसांनी वाहनातून उतरत पळ काढला यावेळी त्यांच्या कमरेला असलेले पिस्तुल रस्त्यावर पोलिसांना आढळून आले; मात्र अपहरणकर्ते फरार होण्यास यशस्वी ठरले.
जाचक मळा वास्तु पार्क येथे राहणारे व शासकीय ठेकेदारीचे काम करणारे शिलसिंह ओमप्रकाश नेहरा हे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आपल्या घरून बिटको चौकातील ऑफिसमध्ये जाण्यासाठी चार चाकी गाडीमध्ये (एम एच 15 एफ एस 65 90) बसून जात असतानायावेळी त्यांच्या घराच्या समोरील बाजूस दोघे संशयित अपहरणकर्ते संशयास्पदरीत्या टेहळणी करत असल्याचे लक्षात आले. नेहरा यांच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर दोघानी त्यांची गाडी थांबवून 'आम्ही क्राईम ब्रँच पोलीस कॉन्स्टेबल पाटील आहे. तुमचे नाव नेहरा आहे ना, तुमच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. तुम्हाला जोशी साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवले आहे' असे सांगून ते दोघे नेहरा यांच्या गाडीत पाठीमागे बसले. नेहरा वास्तु पार्क मधून त्या दोघांना गाडी घेऊन जयभवानी ्रोड येथून जात असताना नगरसेवक कार्यालयाजवळ गाडी हळु करत 'कोणाला तरी सोबत घेतो असे सांगत गाडी थांबविली. नेहरा कार्यालयाबाहेर उभे असलेले संतोष बडदे व श्रीकृष्ण लोहकरे यांच्याकडे गेले असता गाडीत बसलेले ते दोघे भामटे गाडीतून उतरून पळून जाऊ लागले. नेहरा यांना 'तुला व तुझ्या परिवाराला सोडणार नाही,# असे म्हणत त्या दोघांनी जीवन छाया कॉलनीमधून धूम ठोकली.
यावेळी तेथे उपस्थित असलेले )कार्यकर्ते हे आजूबाजूचे दुकानदार यांनी त्या दोघा तोतया पोलिसांचा दोन्ही बाजूने पाठलाग सुरू केला. पाठलाग करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याजवळ गावठी कट्टा असल्याचे लक्षात आल्याने सर्वजण थोडे हळू झाले. पळून जाणाऱ्या त्या दोघा जवळ असलेला गावठी कट्टा खाली पडला मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची माहिती उपनगर पोलीस यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तो गावठी कट्टा जप्त केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.