सोशल मीडियावरील मित्राकड़ूनच अपहरण, मध्य प्रदेशमधून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:34 AM2020-07-08T02:34:28+5:302020-07-08T02:35:02+5:30
आग्रीपाडा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या आजीने १ जुलै रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.
मुंबई : सोशल मीडियावरून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच आरोपीने चार साथीदारांच्या मदतीने मुलीचे अपहरण करीत तिला मध्य प्रदेशला नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचारही केले. आग्रीपाडा पोलिसांनी मध्य प्रदेश येथून मुलीची सुटका करीत पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आग्रीपाडा परिसरात राहणारी १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी तिच्या आजीने १ जुलै रोजी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान ही मुलगी सोशल मीडियावर कुणाच्या तरी संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हाच धागा पकड़ून पोलिसांनी शोध सुरू केला.
आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गणेश जाधव, अभिजित टेकवडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने अधिक तपास सुरू केला.
सोशल मीडियावरील मित्राच्या लिंकवरून मुलगी मध्य प्रदेशला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली. तसेच यांना मध्य प्रदेशला पोहोचविण्यास मदत करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पथकाने शिताफीने मुलीची सुटका करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मुलीला पळवून नेण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे.
मध्य प्रदेश ते मुंबई आणि मुंबई ते मध्य प्रदेश
आरोपी हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून, हरयाणाला काम करतो. नोकरी सुटल्याने तो मध्य प्रदेशला नातेवाइकांकडे राहण्यास आला होता. याचदरम्यान त्याने मुलीला पळवून आणण्याचे ठरविले. यासाठी चार मित्रांच्या मदतीने खासगी वाहनाने मध्य प्रदेशवरून मुंबई गाठली. मुलीला घेऊन ते पुन्हा मध्य प्रदेशला रवाना झाले. वाटेत पोलिसांनी न अडविल्याने लॉकडाऊनच्या काळातही ते मध्य प्रदेशला पोहोचले.