अल्पवयीन मामेबहिणीला पळविले, मंदिरात लग्न अन् भरला ‘मांग में सिंदूर! आता पोलिसांत तक्रार
By प्रदीप भाकरे | Published: October 20, 2022 07:02 PM2022-10-20T19:02:01+5:302022-10-20T19:03:17+5:30
Marriage Crime News: सख्ख्या अल्पवयीन मामेबहिणीला दुचाकीवर पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा बनाव आरोपी आतेभावाला पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला
- प्रदीप भाकरे
अमरावती - सख्ख्या अल्पवयीन मामेबहिणीला दुचाकीवर पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा बनाव आरोपी आतेभावाला पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी अचलपूर येथील विजय नामक २६ वर्षीय तरूणाविरूध्द विनयभंग, अपहरण, बदनामी, शिविगाळ, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, आरोपी व फिर्यादी अल्पवयीन परस्परांचे आतेभाऊ मामेबहिण आहेत. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ च्या सुमारास आरोपी विजय हा तिला जबदस्तीने दुचाकीवर बसवून ब्राम्हणवाडा थडी येथून एका मंदिरात घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावले. तथा आपले लग्न झाले, अशी बतावणी त्याने केली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने ती नखशिखांत हादरली. सख्खा आतेभाऊ असल्याने काय करावे, अन् काय करू नये, अशी तिची अवस्था झाली. तिला उमगेनासे झाले.
नातेवाईकांत बदनामी
यातील फिर्यादी मुुलगी ही केवळ १६ वर्षांची आहे. आरोपीने तिच्या कपाळावर कुंकू भरले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ते तिच्या नातेवाईकांना देखील सांगितले. वारंवार कॉल करून तिला त्रास दिला. तिचा पाठलाग केला. तो शिविगाळ करून धमकी देत असल्याने अखेर तिने महिनाभरानंतर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेऊन आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला.