चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एकजण पसार
By पूनम अपराज | Published: July 16, 2019 03:02 PM2019-07-16T15:02:46+5:302019-07-16T15:07:39+5:30
तीन तरुणांपैकी दोन तरुणांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली
मुंबई - घाटकोपर येथील छेडा नगर येथून तीन तरुणांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील पोलिसांनी या वाहतूक पोलिसाची सुटका केली असून संबंधित तीन तरुणांपैकी दोन तरुणांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. विराज शिंदे (२१), मनोज (२९) यांना पोलिसांनी अटक केली तर राज (२८) पळून गेला आहे.
छेडा नगर येथे तीन तरुणांनी एक कार रस्त्यातच थांबवली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करण्यासाठी त्या कारजवळ गेले. तसेच हे तरुण पळून जाऊ नये म्हणून ते कारमधे बसले. मात्र, या तरुणांनी कार सुरू करून घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर परिसरातच ही कार अडवली आणि वाहतूक पोलिसाची सुटका केली. यावेळी ताब्यात घेतलेल्या विराज आणि गौरवला टिळक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती सांगताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी सांगितले की, विराज शिंदे हा तरुण दारू पिऊन कार चालवत होता. त्याच्यासह इतर दोघांविरुद्ध अपहरणाचा आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दारू पिऊन गाडी चालविणे याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. विराज आणि मनोजला अटक केली आहे. तर राज नावाचा तरुण पळून गेला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
चक्क ट्रॅफिक पोलिसाचे केले अपहरण; दोन तरुण ताब्यात तर एक पसार https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2019