नागपूरात अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या, शहरात खळबळ, आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:16 AM2021-06-11T05:16:50+5:302021-06-11T05:17:29+5:30
Crime News : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राज पांडे (वय १६) नामक शाळकरी मुलाचे आरोपी संतोष शाहू याने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपी शाहूने अपहृत राजच्या पालकांना फोन केला.
- नरेश डोंगरे
नागपूर : शाळकरी मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्यांने मुलाच्या सुटकेच्या बदल्यात नात्यातील एका व्यक्तीच्या शिराची (मुंडके) मागणी केली. अपहरणकर्त्यांच्या या मागणीमुळे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आणि आरोपीच्या तावडीतून अपहृत मुलाची सुटका करून घेण्यासाठी उपराजधानीतील अवघी पोलिस यंत्रणा कामाला लागली असताना अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. मध्यरात्री ही थरारक घडामोड उघड झाल्याने काही वेळेसाठी पोलीसही शहारले.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या राज पांडे (वय १६) नामक शाळकरी मुलाचे आरोपी संतोष शाहू याने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अपहरण केले. काही वेळेनंतर आरोपी शाहूने अपहृत राजच्या पालकांना फोन केला. 'तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून, त्यांची सुखरूप सुटका करायची असेल तर राजच्या काकांचे शीर कापून मोबाईलवर फोटो पाठवा', अशी भयंकर मागणी अपहरणकर्त्यां शाहूने राजच्या पालकांकडे केली. ही मागणी इतकी भयावह होती की, पालकांना दुसरा पर्यायच उरला नाही. सुन्न पडलेल्या पालकांनी एमआयडीसी पोलिसांना ते कळविले. ही विचित्र तेवढीच भयंकर मागणी ऐकून पोलीसही हादरले. त्यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. मुलाचे अपहरण आणि अपहरकर्त्याची भयंकर मागणी ऐकून
अवघी पोलीस यंत्रणाच सक्रिय झाली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेसह सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपहृत राज तसेच अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी कामी लावले. आरोपी शाहूचे लोकेशन वर्धा मार्गावर दिसल्यामुळे आजूबाजूच्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही यासंबंधीची माहिती देऊन आरोपी शाहू तसेच अपहृत राजच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा कामी लावण्यात आली. मध्यरात्री आरोपी शाहू वर्धा मार्गावर पोलिसांच्या हाती लागला.
खेळ संपला
नराधम शाहूचे कपडे अन एकूणच त्याची अवस्था पोलिसांची धडकी वाढवणारी होती. त्याला खाक्या दाखविताच त्याने राजच्या हत्येची कबुली दिली. नंतर त्याने पोलिसांना घटनास्थळ दाखवले.
काळजाचा ठोका चुकला
निरागस राज वंजारी कॉलेज परिसरातील निर्जन ठिकाणी मृतावस्थेत पडून दिसल्याने पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला. पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस पहाटेपर्यंत काम करत होते. आरोपीलाही विचारपूस केली जात होती.