अपहरण करून विवाहितेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:00 AM2021-04-01T03:00:05+5:302021-04-01T03:00:51+5:30
रिक्षाचालकाने घरकाम करणाऱ्या विवाहितेचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून सतत दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भिवंडी : रिक्षाचालकाने घरकाम करणाऱ्या विवाहितेचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी असलेल्या खोलीत डांबून सतत दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे पडघा पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या. शारदाप्रसाद देवमडी मिश्रा (वय ५५, रा. खडवली) हे नराधमाचे नाव आहे.
पडघा-बोरिवली गावात २५ वर्षीय पीडित महिला कुटुंबासह राहते. १८ मार्च रोजी ती कामाला जात असताना रिक्षाचालक शारदाप्रसाद याने जबरदस्तीने रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. पीडित महिलेची प्रकृती बरी नसल्याने ती चक्कर येऊन रिक्षात झोपली. काही वेळाने शुद्धीवर आली असता ती एका खोलीत विवस्त्र अवस्थेत होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती गायकवाड यांना पीडितेच्या आईचा फोन आला असता, त्यांनी पीडित महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. तिने पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लकी हॉटेलचे नाव घेताच फोन बंद झाला. याआधारे गायकवाड यांनी शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे व शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांना संपर्क करून आरोपीस अटक केली.
आरोपी पोलीस कोठडीत
नराधम रिक्षाचालक रिक्षाने पीडितेला खडवलीफाट्यावरील लकी हॉटेल येथे घेऊन आला. त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी शारदाप्रसाद याच्यावर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.