सांगलीमध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, भाजप जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकरसह तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 06:22 AM2021-06-07T06:22:59+5:302021-06-07T06:23:32+5:30
Crime News : सनी गायकवाड, शौकत नदाफ (दोघेही रा. भिलवडी), अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत.
सांगली : उसने घेतलेल्या १५ लाख रुपयांच्या मोबदल्यात १४ लाख व्याजाच्या मागणीसाठी बांधकाम व्यावसायिकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत अपहरण केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर (रा. भिलवडी) यांच्यासह अन्य दोघांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल तावदर यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. सनी गायकवाड, शौकत नदाफ (दोघेही रा. भिलवडी), अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत.
फिर्यादी राहुल तावदर हे बांधकाम व्यावसायिक असून, पाच वर्षांपूर्वी त्यांचे वडील मोहन तावदर यांनी सुरेंद्र वाळवेकर यांच्याकडून १५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यानंतर त्यांनी ही रक्कम वाळवेकरला परतही दिली होती. रक्कम वापरून ती परत दिल्याने व्याज म्हणून १४ लाख रुपये द्यावे लागतील यासाठी वाळवेकरचा तगादा सुरू होता.
त्यावेळी खंडोबाचीवाडी (ता. पलूस) येथे असलेला तावदर यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपाच्या विक्रीचा व्यवहार सुरू असून, तो झाल्यानंतर पैसे देतो, असे फिर्यादी राहुलचे वडील मोहन यांनी सांगितले होते. मात्र, पेट्रोल पंपाच्या व्यवहारात ॲडव्हान्स म्हणून रक्कम मिळाल्याची माहिती वाळवेकरला मिळाल्यानंतर त्याने पुन्हा व्याजाच्या रकमेसाठी मागणी सुरू केली होती.