४ वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरण, सहा आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 08:07 PM2021-02-28T20:07:57+5:302021-02-28T20:08:33+5:30
Kidnapping case of 4 year-old boy : न्यायालयासमोर हजर, तपासात आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता
अमरावती : चार वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींचा पीसीआर (पोलीस कोठडी) २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला. मात्र, या प्रकरणात आणखी महत्त्वाचा उलगडा होणे गरजेचे असल्याने राजापेठ पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर करून आरोपीविरुद्ध पोलिसांनी गोळा केलेले सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले. तसेच या गुन्ह्यात आरोपींकडून आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने हे ग्राहय धरून आरोपींना पुन्हा सहा मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला.
अटक केलेल्या सातवी आरोपी रुखसार शेखला १ मार्चपर्यंत पीसीआर मिळाला. ६ मार्चपर्यंत पीसीआर मिळालेल्या आरोपींमध्ये हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (२५, रा. फलटण चौकी कोठला अहमदनगर), अल्मश ताहीर शेख (१८, रा. कोठला अहमदनगर), मुसाहीब नासीर शेख (२१, रा. मुकुंदनगर अहमदनगर), आसिफ हिनायत शेख (२४, रा. कोठला अहमदनगर), फैरोज रशिद शेख (२५, रा. कोठला अहमदनगर), मोनिका जसवंतराय लुणीया(४७, रा. शारदानगर अमरावती) यांचा समावेश आहे.
दोन आरोपी अद्यापही पसारच
या घटनेतील मास्टरमाईंड इसार शेख ऊर्फ टकलू व त्याचा साथीदार अज्जू अजीज हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहे. दोन्ही आरोपी मुंबईत पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, जोपर्यंत ते हाती लागत नाही तोपर्यंत घटनेचा तपास पूर्ण होऊ शकत नाही. आरोपी हाती लागल्यानंतर आणखी किती आरोपींचा यात सहभाग आहे, हे स्पष्ट होईल.
गुन्ह्यात वापरलेले मोबाईल होणार जप्त?
अटकेतील आरोपींकडून पाच कोटींच्या खंडणीसाठी दादीच्याच सांगण्यावरून अपहरणाचा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. मात्र, गुन्ह्यात वापलेले चार ते पाच मोबाईल अद्याप जप्त केले नाही. पोलीस सदर मोबाईल जप्त करणार असून, याप्रकरणी दोन कार व दुचाकी जप्त केलेल्या आहेत.
आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून ते न्यायालयासमोर ठेवले. यात आणखी तपासाची गरज असल्याचे न्यायालयाला सांगितले. ते न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना ६ मार्चपर्यंत पीसीआर वाढवून दिला आहे. - मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राजापेठ