विकी देशमुख टोळीवर अपहरण, खंडणीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 10:03 AM2022-10-10T10:03:49+5:302022-10-10T10:03:55+5:30
८० लाख उकळले : बळकावली दगडखाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेलचा गुंड विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीवर वॉन्टेड असताना गतवर्षी त्याने व्यावसायिकाचे अपहरण करून १० कोटीची खंडणी मागितली होती. तर ५० लाख घेतल्यानंतर त्याची सुटका केल्यानंतर पुन्हा ३० लाख रुपये उकळले होते.
पनवेल परिसरातील दगडखाण व्यावसायिकासोबत डिसेंबर २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे. अपहरणाच्या घटनेच्या काही दिवस अगोदरपासून त्यांना विकी देशमुख टोळीकडून खंडणीसाठी धमकी येत होत्या. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या विकी देशमुख व त्याच्या सहकाऱ्यांनी १४ डिसेंबरला या व्यापाऱ्याचे पोलीस पाटी लावलेल्या गाडीतून पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले होते. यानंतर त्यांना भिवंडी पाईपलाईन रोडवरून काही अंतरावरील जंगलात नेले होते. त्या ठिकाणी विकी देशमुख याने व्यापाऱ्याकडे १० कोटीची मागणी करत ती पूर्ण न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु तेवढी रक्कम नसल्याचे व्यावसायिकाने सांगितल्यानंतर शेवटी २ कोटी ठरवण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी गुजरात रोडवर शिरसाठ फाट्यावर ती रक्कम स्वीकारून त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुन्हा ३० लाख रुपये घेऊन नीलेश देशमुखच्या खात्यावर प्रतिमहिना ३५ हजार रुपये घेत होता. त्याशिवाय व्यावसायिकाच्या खाणीचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने ताब्यात घेतला होता. मात्र गेल्या महिन्यात देशमुख याला अटक झाल्याचे समजल्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार विक्रांत ऊर्फ विकी देशमुख, जितेंद्र देशमुख, परशुराम मोकल, उत्तम देशमुख, नीलेश देशमुख, धनेश थोरात, मयूर कोळी व इतर दोघे अशा ९ जणांवर न्हावा शेवा पोलीस ठाण्यात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
फरार असतानाही
सुरू होते गुन्हे
विकी देशमुख व त्याच्या टोळीवर मोक्का लागलेला असून यामध्ये ते पोलिसांना पाहिजे असतानाही तो उघडणे पनवेल परिसरात फिरून खंडणी उकळत होता असे या घटनेवरून समोर येत आहे. तर तक्रारदार व्यापाऱ्याला धमकावताना इतर एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी उचलायचा त्यांचा कट शिजत होता. शिवाय खंडणी नाकारल्यास अशोक घरतला जसे मारले तसे संपवू अशा धमक्याही दिल्या जात होत्या.