भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; मुलीच्या शोधासाठी पोलिसांचा हैदराबादमार्गे सोलापूरपर्यंत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 01:20 PM2022-11-04T13:20:02+5:302022-11-04T13:25:02+5:30
मुंबई : मुंबईतून विक्रीसाठी अपहरण केलेल्या दोन बाळांच्या सुटकेपाठोपाठ सांताक्रूझमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास गुन्हे ...
मुंबई : मुंबईतून विक्रीसाठी अपहरण केलेल्या दोन बाळांच्या सुटकेपाठोपाठ सांताक्रूझमधून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. भीक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मुलीच्या शोधासाठी मुंबई ते हैदराबाद तेथून सोलापूर प्रवास करत आरोपीना जेरबंद केले आहे.
सांताक्रूझ येथील एसएनडीटी कॉलेजसमोरील बसस्टॉप समोरील फुटपाथवरून ३० ऑक्टोबरला रात्री मुस्कान शेख यांची १ वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ आली. सांताक्रूझ पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने याचा समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये आरोपीने सांताक्रूझवरून नालासोपारा ट्रेन पकडलेली दिसून आले. पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला.
पोलिसांचे दुसरे पथक नालासोपाराला गेले. मात्र, तेथेही कोणी हाती लागले नाही. पुढे, दादरवरून हैद्राबादला निघून गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी स्थानिक आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांचे पथक हैद्राबादला पोहोचेपर्यंत आरोपी सोलापूरला निघाल्याचे समोर आले. त्यानुसार, रेल्वे पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
दीड महिन्यात ४८७ मुलांची सुटका-
मुंबई पोलिसांनी १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान राबविलेल्या ऑपरेशन रि युनाईट अंतर्गत २५७ मुलींसह एकूण ४८७ अल्पवयीन मुलांचा शोध घेतला आहे. त्यामध्ये यामध्ये रेकॉर्डवरील मिळून आलेली २०३ तर, रेकॉर्डवर नसलेल्या २७६ जणांचा समावेश आहे. या ऑपरेशन दरम्यान ८ बालकामगार मिळून आले आहे.
याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आले असून दोघेही नेहरूनगर येथील रहिवासी आहे. शरिफा शेख आणि सुजाता पासवान अशी या दोघींची नावे आहेत. भीक मागण्यासाठी मुलीचे अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.
गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते मुलीला सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे, स्नेहल पाटील पोलीस अंमलदार संजय भोसले, साधना सावंत, प्रशांत भूमकर, शार्दुल बनसोडे यांनी ही कारवाई केली आहे.