खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकरचे अपहरण; मारहाण करून जिममध्ये ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 11:06 AM2021-04-25T11:06:35+5:302021-04-25T11:11:05+5:30
Kidnapping of a property broker for ransom in Akola : तीन जणांनी ३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर रिजवान रहिमत यांना बेदम मारहाण केली.
अकोला : डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका प्रॉपर्टी ब्रोकरचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना मारहाण करीत जिममध्ये डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. यामध्ये एका नगरसेवकाच्या भावाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
गोडबोले प्लॉट येथील रहिवासी रिजवान अहमद शेख रहिमत (वय ३४ वर्षे) प्रोपर्टी ब्रोकर असून त्यांचा व्यवसाय चांगला चालतो. हा व्यवसाय चालविण्यासाठी पाच आरोपींनी सुमारे ३ लाखांची खंडणी त्यांना मागितली. या खंडणी मागणाऱ्या टोळीमध्ये जोगळेकर प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद जावेद इक्बाल, बॉडी बिल्डर सय्यद मोहम्मद सय्यद हुसेन व महमूद मास्टर यासह आणखी दोघांचा समावेश आहे. या पाच आरोपींपैकी मोहम्मद जावेद इक्बाल याने २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रिजवान अहमद शेख रहिमत यांना घरासमोर बोलावले. त्यानंतर एमएच ३० एझेड ३१३१ क्रमांकाच्या इकोस्पोर्ट कारमध्ये जबरदस्तीने घुसवून त्यांना टॉवर चौकातील गॅलेक्सी जिममध्ये डांबून ठेवले. यावेळी या तीन जणांनी ३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी प्रॉपर्टी ब्रोकर रिजवान रहिमत यांना बेदम मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून पैसे न दिल्यास संपूर्ण परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रॉपर्टी ब्रोकरच्या खिशातील २० हजार रुपयांची रक्कमही या आरोपींनी काढून घेतली. स्वतःची सुटका करण्यासाठी प्रॉपर्टी ब्रोकरणे त्यांच्या होकारात होकार देऊन सुटका करून घेतली. त्यानंतर घरी परतले असता संपूर्ण कुटुंबीयांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. डाबकी रोड पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३४२, ३८६, ३२३, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींमध्ये एका नगरसेवकाच्या भावाचाही समावेश आहे.
पोलीस अधीक्षकांनी घालावे लक्ष
शहरात खंडणीखोरांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणात पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी लक्ष घालून या खंडणी बहाद्दरांना हद्दपार, तडीपार तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.