200 रुपये दिले नाही म्हणून डोक्यात हातोडा हाणून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:58 PM2020-05-06T21:58:06+5:302020-05-06T22:00:55+5:30
आरोपीस 10 मे पर्यंत कोठडी
मीरारोड - 200 रुपये खर्चाचे दिले नाही म्हणून एका माळीकाम करणाऱ्या कामगाराने सुपरवायझर झोपला असताना डोक्यात हातोडा मारून हत्या केल्याप्रकरणी आरोपीला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ सिंगापुर इंटरनेशनल शाळा आहे. सदर शाळेतील उद्यान आदींचे माळी काम करण्यासाठी गुजरातचा ठेकेदार नेमलेला आहे. सदर ठेकेदाराने कामासाठी ठेवलेले कर्मचारी येथेच लेबर कॅम्पमध्ये राहतात.
सोमवारी सायंकाळी दाखल गुन्ह्या नुसार, सुपरवायझर देवा उर्फ देवीलाल हरिराम कालागुमान (25) मूळ रा. सलवाडा, उदयपूर, राजस्थान याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. त्याच्याशेजारी लक्ष्मण दिता काकण (58) सागवाडा, उदयपूर हा माळीकाम करणारा मजूर बसला होता. त्यानेच देवासोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तो झोपला असताना डोक्यात हातोडा मारून खून केला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ठाणे न्यायालयाने 10 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी दिली. आरोपीला 5 हजार पगार होता व दर आठवड्याला 200 रुपये खर्चाला दिले जायचे. मात्र, आरोपी आजारी असल्याने गेल्या आठवड्यात कामावर आला नव्हता म्हणून देवाने खर्चाचे 200 रुपये इतर मजुरांना दिले मात्र आरोपीला दिले नाहीत. त्यावरून राग येऊन आरोपीचे देवासोबत भांडण झाले आणि रात्री हत्या केल्याचे हजारे म्हणाले.