पिंपळोली येथे खुनाची सुपारी घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 20:38 IST2019-04-03T20:31:54+5:302019-04-03T20:38:03+5:30
जुना मुंबई- पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्याजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला

पिंपळोली येथे खुनाची सुपारी घेतल्याच्या संशयावरून एकाचा खून
कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्याजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. खुनाची सुपारी दिल्याच्या संशयावरून हा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी फिर्याद युसुब बबन शेख ( वय ४०, रा. ताजे, मावळ ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी खंडू भगवान कुटे, अविनाश उर्फ लालू भगवान कुटे ( रा. ताजे, मावळ ) व इतर चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि. २ ) रात्री मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाजवळ पिंपळोली गावाच्या हद्दीत पिंपळा मळा भागात आयुब याकुब शेख (वय २६, रा. ताजे, मावळ ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत आयुब शेखने खंडू कुटे याच्या खुनाची सुपारी घेतली असल्याच्या संशयावरून त्याला द्रुतगती मार्गाच्या जवळील पिंपळा मळा येथे नेत शस्त्राने चेहरा व डोक्यावर मारहाण करत आरोपींनी खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह झायलो गाडी (एमएच. ०६ बीई. ७१५४ ) डिकीत भरून गाडी त्याच ठिकाणी सोडून फरार झाले आहेत. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करत आहेत.