दोन मुलांना मारून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले; पतीसह पाच जणांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: May 6, 2023 05:10 PM2023-05-06T17:10:53+5:302023-05-06T17:11:27+5:30
चारित्र्यावरून संशय घेत पत्नीला मानसिक त्रास दिल्याचा प्रकार
रूपेश हेळवे, सोलापूर: पतीने व त्यांच्या कुटुंबियांनी चारित्र्यावर संशय घेत मानसिक त्रास देत ज्योती चव्हाण (वय २७) यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ज्योती यांचे वडील दिलीप व्यंकटराव गायकवाड ( वय ५९, रा. यशवंत नगर, उमरगा, उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
गुरूवारी सायंकाळी मुलगा अथर्व (वय साडेतीन वर्षे) आणि मुलगी आर्या (वय २) हे व ज्योती या गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळले होते. त्यानंतर शुक्रवारी उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, गायकवाड यांच्या फिर्यादीनूसार ज्योती यांचा पती सुहास कैलास चव्हाण हा व त्याचे कुटुंबीय हे ज्योती यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मानसिक त्रास देत होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पती सुहास चव्हाण, दीर सुशांत कैलास चव्हाण, सासू मंगल कैलास चव्हाण, नणंद सोनू लक्ष्मण जाधव, जाऊ रेखा सुशांत चव्हाण ( सर्व रा. कोंडी, उत्तर सोलापूर ) यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सपोनि देशमुख करत आहेत.