परळीत मुंडेनामक व्यक्तीचा खून; तहसिल कार्यालयाजवळ मृतदेह फेकला, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:42 AM2023-10-22T11:42:59+5:302023-10-22T11:45:44+5:30
महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते.
संजय खाकरे
परळी (बीड) - गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना परळी शहरात उघडकीस आली आहे. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह परळी तहसील कार्याल्यासमोरील मैदानात रविवार दिनांक 22 रोजी सकाळी आढळून आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली आहे. महादेव मुंडे (रा. भोपळा, तालुका परळी वय 40) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खुनाच्या या घटनेने शहर हादरले.
महादेव मुंडे हे भोपळा गावातील मूळ रहिवाशी असून परळीच्या आंबेजोगाई रोडवरील एका नगरमध्ये रहावयास होते. रविवारी सकाळी महादेव मुंडे यांचा मृतदेह येथील तहसिल कार्यालयसमोरील जागेत आढलून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. परळी शहर पोलिसांना ही घटना समजताच तातडीने शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप, पोलीस जमादार भास्कर केंद्रे, गोविंद भताने, राम रेडेवार, दत्ता गित्ते ,विष्णू फड, किशोर घटमल, व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळविली. लागलीच अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांनी परळीत येऊन घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
हा खुनाचा प्रकार आहे. गळ्यावर व गालावर शस्त्राने वार केल्याने जखमचे व्रण होते. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस तपासात कारण पुढे येईल
- रवी सानप .पोलीस निरीक्षक परळी शहर पोलिस ठाणे