पूर्ववैमनस्यातून खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By विशाल सोनटक्के | Published: October 25, 2023 03:25 PM2023-10-25T15:25:50+5:302023-10-25T15:26:22+5:30
तिघांजणावर गुन्हा दाखल : आरोपीमध्ये एका अल्पवयीनाचा समावेश
यवतमाळ : आई मी नाश्ता केला, तु जेवण करून घे असे सांगून घराबाहेर पडलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेहच पूस नदी पात्रात आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासात तिघाजणांना ताब्यात घेतले असून यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदरील तिघांनी पूर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली असे पोलिसांनी सांगितले.
पुसद शहरातील मच्छीमार्केट आंबेडकर वार्ड येथील शेख सलीम शेख युनुस याने १४ ऑक्टाेबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून त्याचा भाऊ शेख अलीम उर्फ बाबू हा घरातून निघून गेल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी पुसद शहर ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची नोंद घेतली होती. दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहरातील तवक्कलशहाबाबा दर्गाजवळ पूस नदीच्या किनारी सडलेल्या अवस्थेत व हातपाय बांधून कपड्याने गळा आवळलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. फिर्यादी शेख सलीम शेख युनुस याने मृतकाची ओळख पटवत हा आपला लहान भाऊ शेख अजीम उर्फ बाबू शेख युनुस (२३) असल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक दृष्ट्या काही बाबी पुढे आल्यानंतर सदर मृतक तरुणासोबत घटनेच्या रात्री असलेल्या काही मुलांची डीबी पथकाने गोपनीय माहिती घेतली. त्यावरून तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर काही माहिती पुढे आली. अखेर पोलिस खाक्या दाखवताच तिघांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. अटक केलेल्यांमध्ये अनिकेत रवी मस्के (१८) रा. मुखरे चौक पुसद आणि अजय पंडित जोगदंडे (२१) रा. आंबेडकर वार्ड पुसद यांचा समावेश असून तिसरा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पुसद शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी सांगितले.