नैसर्गिक विधी केल्याच्या रागात अल्पवयीन मुलाची बालगृहातच हत्या; माटुंगा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 07:52 AM2022-08-20T07:52:18+5:302022-08-20T07:53:12+5:30
याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माटुंगा येथील बालगृहातील कक्षात नैसर्गिक विधी केल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांनी केलेल्या मारहाणीत एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे.
गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरत असलेल्या १६ वर्षीय मुलाला डी. बी. मार्ग पोलिसांनी ६ ऑगस्टला माटुंगा येथील डेव्हीड ससून औद्योगिक शाळा/ बालगृहात ठेवले. कोरोनाच्या नियमामुळे त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथेच मारहाण करणारे अन्य ४ तरुण होते. त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते. तसेच तो नेहमी शांत राहायचा. १६ ऑगस्टला त्याने कक्षातच नैसर्गिक विधी केली. याच रागात चौघांनी त्याला मारहाण केली. त्यात तो बेशुद्ध झाला.
सायंकाळी ७ वाजता वॉर्डन महिला तेथे जाताच त्यांना संबंधित मुलगा बेशुद्धावस्थेत दिसला. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात हलवले. मात्र, त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले.
कोण आहेत आरोपी?
सीसीटीव्हीमध्ये त्याला मारहाण झाल्याचे उघड झाले. त्यानुसार, चारही मुलांकडे चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारही जणांची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यामध्ये १२, १५, १६ आणि १७ वयोगटातील मुलांचा समावेश आहे.