IAS ची तयारी करणाऱ्या युवकाची हत्या; २० दिवसांत पोलिसांनी गुन्हेगारांना पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 07:48 PM2023-11-06T19:48:10+5:302023-11-06T19:48:40+5:30
२४ वर्षीय दुर्गैश कुमार मिश्रा हा प्रयागराज इथं स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता
आझमगड – उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली होती. अखेर २० दिवसांनी पोलिसांनी या हत्येतील आरोपीला अटक केली आहे. आतापर्यंत ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाची स्वप्न अपूर्णच राहिली. स्पर्धा परीक्षेसोबतच पार्ट टाईम कॅब चालवून हा युवक त्याचे घर चालवत होता. अटक केलेल्या आरोपींकडून सुटकेस आणि हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
२४ वर्षीय दुर्गैश कुमार मिश्रा हा प्रयागराज इथं स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने तो पार्टटाईम कॅब चालवत होता. २०१९ पासून तो त्यांच्या मामाकडे राहायला होता. दुर्गेशचे वडील गावात शेती करतात. याच दुर्गैशची हत्या करण्यात आली. मृतदेहाच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर मारहाणीच्या खूणा होत्या. पोलिसांनी हत्येच्या २० दिवसांनी दुर्गेशच्या मारेकऱ्यांना पकडले आहे.
याबाबत पोलीस अधिकारी सुनील कुमार दुबे म्हणाले की, या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून आरोपीपर्यंत पोलीस पोहचली. प्रयागराज ते जौनपूर, आझमगड जिल्ह्यातील अहरौला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल टॉवर बीटीएस लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आतापर्यंत या प्रकरणी ४ आरोपींना बेड्या घातल्या आहेत. पोलीस चौकशीत लुटीच्या हेतूने ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कपरियापार गावातील रहिवासी दुर्गेश मिश्राचा मृतदेह १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अहरौला पोलिस स्टेशन हद्दीतील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला होता. रस्त्याने जाणाऱ्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली. दुर्गेश कुमार मिश्रा हा प्रयागराजमध्ये राहून मामाची कार चालवून आपला उदरनिर्वाह करायचे, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. १३ ऑक्टोबर रोजी तो प्रयागराजहून बाहेर जाण्यासाठी निघाला होता. पोलिसांनी बेपत्ता कारचा क्रमांक वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना पाठवून माहिती मागवली. दरम्यान, दुर्वासा-गाहजी रस्त्यावर एका कारमध्ये काही तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एकाला पायात गोळी लागली तर दुसऱ्याला पोलिसांनी अटक केली.