केवळ मजेसाठी करत होता लोकांची हत्या; पोलिसांनी आवळल्या सायको किलरच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:29 PM2020-06-14T16:29:25+5:302020-06-14T16:31:53+5:30
आतापर्यंत राधेश्यामने २ जणांची हत्या केली आहे तर आणखी ३ जणांची हत्या त्याला करायची होती.
प्रयागराज – कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून हजारो लोकांचा जीव गेला आहे. अशा संकटकाळात उत्तर प्रदेशात एका सायको किलरला पोलिसांनी पकडलं आहे. फक्त मजा घेण्यासाठी तो लोकांची हत्या करत होता अशा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात उघड झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
३० वर्षाच्या या सायको किलरचं नाव राधेश्याम असं आहे. ज्यावेळी राधेश्याम त्याच्या मोठ्या भावाची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी त्याला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत राधेश्यामने २ जणांची हत्या केली आहे तर आणखी ३ जणांची हत्या त्याला करायची होती. एटाच्या धरमपूर गावात राहणारा राधेश्यामच्या डोक्यावर परिणाम झाला होता, गेल्या ४ फेब्रुवारीला त्याने दोन अल्पवयीन मुलांची हत्या केली होती. त्यातील एक ४ वर्षाचा तर दुसरा ५ वर्षाचा होता.
ही दोन मुले राधेश्यामचे भाचे होते, सकरौली स्टेशन हाऊसच्या अधिकारी कृतपाल सिंह यांनी सांगितले की, ११ जून रोजी रात्री राधेश्याम त्याचा भाऊ विश्वनाथ सिंहची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता. विश्वनाथ सिंह हा झोपला होता. पण घरातील इतर लोकांच्या सावधानतेने विश्वनाथचे प्राण वाचले, राधेश्यामला घरातील लोकांनी पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात दिले. पोलीस चौकशीत राधेश्यामने लोकांची हत्या करण्याची मजा येते असं पोलिसांना सांगितले.
एटा पोलीस अधीक्षक सुनीलकुमार सिंह म्हणाले की, आरोपीने त्याच्या दोन भाच्याची हत्या केल्याचं कबूल केले, तसेच त्याला आणखी ३ जणांची हत्या करायची होती असं त्याने सांगितले. लोकांची हत्या करुन मला आनंद मिळतो असं राधेश्याम म्हणाला, तो एक सायको किलर असल्याचं पोलीस म्हणाले. यापूर्वी झालेल्या एकाच्या हत्येमध्ये पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना जेलमध्ये पाठवले होते, तर दुसऱ्या हत्येत पोलिसांनी अन्य ३ जणांना पकडले होते. दरम्यान, या आधीच्या हत्येतील पकडलेल्या लोकांना पोलीस गुन्ह्यातून त्यांचे नाव रद्द करुन जामीन देणार आहे. पोलिसांनी आरोपी राधेश्यामला न्यायाधीशांसमोर उभं करुन त्याला जेलमध्ये पाठवलं आहे.