आर्यन खान प्रकरणातील किरण गोसाविला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 04:22 PM2021-12-02T16:22:52+5:302021-12-02T16:23:20+5:30
Kiran Gosavi : फसवणूक करतानाच त्याने अन्य व्यवसायानिमित्त पालघरमध्ये अनेक फेऱ्या मारल्याने जिल्ह्यात वाढत्या ड्रग पुरवठ्यात त्याचा हात आहे का? ह्याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.पालघर न्यायालयाने गोसावी ला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हितेंन नाईक
पालघर - मुंबई क्रुज ड्रग प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी ह्याने एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्या प्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीसानी गोसावी ह्याला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले.फसवणूक करतानाच त्याने अन्य व्यवसायानिमित्त पालघरमध्ये अनेक फेऱ्या मारल्याने जिल्ह्यात वाढत्या ड्रग पुरवठ्यात त्याचा हात आहे का? ह्याचाही तपास पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.पालघर न्यायालयाने गोसावी ला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथे नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून नवी मुंबई येथील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून सुमारे 1 लाख 65 हजाराची रक्कम गोसावी यांनी आपल्या बँक खात्या द्वारे घेतली होती. ह्या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्या नंतर ते विमानतळावर पोचल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे तपासणीत आढळल्यावर आपली फसवणूक झाल्याने केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना त्याचे एनसीबी सह अन्य पोलीस अधिकाऱ्यांचे असलेले संबंध पाहता त्याचा तक्रारी अर्ज धूळ खात पडून होता. आर्यन खान ड्रग प्रकरणातील त्याचा सहभाग पाहता घाईघाईने केळवे पोलीस ठाण्यात गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.पुणे पोलिसांनी गोसावी ला अटक केल्या नंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत अखेर केळवे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड ह्यांनी पुणे पोलिसांकडून बुधवारी ताब्यात घेतले.
अनेक प्रकरणात वादग्रस्त व्यक्तिमत्व बनलेल्या किरण गोसावी ह्याचे बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खान सुटकेसाठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख स्वीकारणारे सॅम डीसुझा म्हणून पालघर मधील हेनिक बाफना ह्याचा फोटो व्हायरल झाल्या नंतर बाफना ह्यांनी प्रसार माध्यमांसमोर येत सॅम डिसुझा म्हणजे मी नाही असे जाहीर करीत पोलीस अधिक्षकाकडे प्रभाकर विरोधात तक्रार दाखल केली.
पालघर न्यायालयाने किरण गोसावी ला 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे केळवे पोलिसांनी सांगितले. गोसावी ह्याचे बालपण मनोर मध्ये गेल्याने पालघर मध्ये काही व्यवसायाच्या निमित्तने अनेक वेळा तो येऊन गेल्याचे समोर आले आहे. केळवे पोलिसांनी गोसावी ह्यांनी पालघर मधील येण्याच्या कारणांचा आणि त्याचा कोणाशी संबंध होता ह्याचा शोध घ्यायला हवा.जिल्ह्यातील जवळपास शहरी आणि ग्रामीण भागात ड्रग्ज चा होणाऱ्या पुरवठ्यात गोसावी चा हात आहे का?किंवा जिल्ह्यात मॅफेड्रीन हे मादक द्रव्य बनविणाऱ्या टोळ्यांशी ह्याचा काही संबंध आहे का?ह्याचा शोध ही पोलिसांनी घेऊन मादकद्रव्याची सवय तरुणांना लावून युवाशक्ती उद्धवस्त करण्याचे रॅकेट उध्वस्त करायला हवे अशी मागणी होत आहे.