चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ व्हायरल, ८ विद्यार्थ्यांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:49 AM2022-07-23T07:49:42+5:302022-07-23T07:50:11+5:30
या कथित चुंबन स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मंगळुरू (कर्नाटक) : येथील एका अपार्टमेंटमध्ये चुंबन स्पर्धेत सहभाग व त्याचा व्हिडीओ बनवून दोन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी येथे आठ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित चुंबन स्पर्धेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या विद्यार्थ्यांविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ३५४, ३५४ (क) तसेच १२० (ब), पोक्सो व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर चुंबनाचा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा आरोपींत समावेश आहे. हे विद्यार्थी गेल्या वर्षी फेब्रुवारीत एका अपार्टमेंटमध्ये जमले होते. तेव्हा त्यांनी सत्य आणि आव्हान (ट्रुथ ऑर डेअर) ही चुंबन स्पर्धा घेतली होती. व्हायरल व्हिडीओत गणवेश घातलेले मुलगा-मुलगी चुंबन घेताना तर अन्य विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देताना दिसतात.
या आठ मुलांनी नंतर चुंबन स्पर्धेच्या व्हिडीओचा वापर करून दोन युवतींवर विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे तसेच गंभीर बाबींची माहिती पोलिसांना द्यायला हवी, असे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार म्हणाले.