लग्नास नकार दिल्याने तरुणीचे अपहरण करुन चाकू हल्ला : हडपसरमधील मगरपट्टा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 11:35 AM2019-08-09T11:35:36+5:302019-08-09T11:36:04+5:30
७ ते ८ वर्षांपासूनचे प्रेमसंबंध तुटल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन
पुणे : प्रेमसंबंध तुटल्यानंतर लग्नास नकार दिल्याने एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर चाकूने सपासप वार करुन तिला गंभीर जखमी करण्याची घटना हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली आहे़. मुंढवा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (रा़ रामटेकडी) आणि चंदन चव्हांडके (रा़. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़.
याप्रकरणी वडकीनाका येथे राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार मुंढवा पुलापासून हडपसर मगरपट्टा सिटीदरम्यान गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी २०११ मध्ये रामटेकडी येथे राहायला असताना तिच्या घरासमोर राहणाऱ्या प्रसाद सोनवणे याच्याबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले़ गेले. ७ ते ८ वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते़. दरम्यान ही तरुणी आपल्या कुटुंबासह वडकीनाला येथे राहायला गेले़. मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रसाद या तरुणीला लग्न करु म्हणून मागे लागला होता़. दारु पिऊन तो तिला मारहाणही करुन लागला़. त्यामुळे तिने त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले़. तरीही तो तिला वारंवार फोन करीत़ तसेच ती कामाला असलेल्या ठिकाणी बाहेर येऊन थांबत असे़. ८ ऑगस्टला ती सायंकाळी साडेसातला कामावरुन बाहेर पडल्यावर प्रसाद दोन मित्रासह बाहेर उभा होता़. त्याने तिला जबरदस्तीने रिक्षात बसायला लावले़. रिक्षा मगरपट्टा सिटीमध्ये गेल्यावर त्याने पुन्हा तिला माझ्याबरोबर लग्न कर असा आग्रह केला़. तिने नकार देताच त्याने आपल्याकडील चाकू काढून तिच्या छातीवर, पाठीवर सपासप वार केले़. तू माझ्याशी लग्न केले नाही तर तू जिवंत असेपर्यंत मी तुला त्रास देणार, तुला ठार करणार, तुझे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन तिला जबरदस्तीने आपल्या घरी घेऊन गेला़. या घटनेची माहिती मिळताच या तरुणीची बहिण प्रसादच्या घरी आली़. तिने तिला हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात दाखल केले़. मुंढवा पोलिसांनी तिघांवर अपहरण आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.