पब्जी गेम खेळण्याच्या वादातून चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 09:22 PM2019-03-14T21:22:04+5:302019-03-14T22:31:11+5:30
दोघांची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई - कुलाब येथील नेहरुनगर परिसरात पब्जी गेम खेळण्यावरुन झालेल्या वादात दोन सख्या भावाने दोघांवर चाकने वार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावाना ताब्यात घेत त्यांची रवानगी बालसुधारगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहावीतील विद्यार्थ्याने भावाच्या मदतीने बारावीतील विद्यार्थ्यासह दोघांना चाकूने भोसकल्याची घटना सोमवारी रात्री कुर्ला पूर्व नेहरूनगर मैदानाजवळ घडली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी सायन टिळक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ऐराफ आणि समद असे या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. ऐराफ हा बारावीचा विद्यार्थी असून त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून समद हा त्याचा मित्र आहे. कुरेशी नगर कुर्ला पूर्व येथे राहणारा ऐराफ आणि समद या दोघांचा मित्र असलेला हल्लेखोर हा दहावीतील विद्यार्थी आहे. चोघे जण कुर्ला नेहरूनगर मैदान या ठिकाणी भेटले असता त्यांच्यात पब्जी या मोबाईल गेमवरून वाद सुरु होता.
या वादाचे पर्यवसन हाणामारीत होऊन दहावीतील विद्यार्थ्याने आणि त्याच्या भावाने ऐराफ आणि समद या दोघांना चाकूने भोसकले. या हल्ल्यात ऐराफ आणि समद हे दोघे गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची माहिती नेहरुनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून दोघांना पुढील उपचारासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा भावांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही अल्पवयीन असल्यामुळे दोघांची डोंगरीच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.