लग्नपत्रिकेत चाकू, FB फ्रेंड न बनवल्याने 16 वर्षीय मुलीची हत्या, आईवरही हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:29 PM2022-06-20T21:29:01+5:302022-06-20T21:30:08+5:30
Crime News : पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
मथुरा जिल्ह्यातील आई-मुलीच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याने माथेफिरूने ही घटना घडवली होती. तरुणाने आधी अल्पवयीन मुलीवर वार करून खून केला आणि मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी हा मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे.
पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर फ्रेंड बनण्याची विनंती न स्वीकारल्याने तरुणाने ही घटना घडवली.
एसपी मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितले की, नागला बोहरा गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैनिक तेजवीर सिंग हे फरीदाबाद (हरियाणा) येथील एका कारखान्यात सुरक्षा कर्मचारी आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा घरी नसताना मुझफ्फरनगरच्या ठाणे मंडी भागातील कुकडा गावातील रवी हा तरुण लग्नपत्रिका घेऊन त्याच्या घरी पोहोचला आणि त्याची १६ वर्षांची मुलगी खोलीत येताच, त्याने लग्नपत्रिकेत लपवून ठेवलेला चाकू काढला आणि त्याने मायलेकींवर अनेक वेळा हल्ला केला.
त्याने सांगितले की, मुलीचा आरडाओरडा ऐकून तिची आई सुनीता खोलीत पोहोचली तेव्हा रवीने तिच्या खांद्यावर आणि कमरेवर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी रवीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर चाकूने वार करून जखमी केले.
डीसीपी धर्मेंद्र चौहान यांनी सांगितले की, हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या आईला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर आरोपी रवीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.