दारूच्या नशेत बापाला मारायला घेतलेला चाकू मुलाच्याच पोटात गेला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 02:28 PM2021-02-13T14:28:38+5:302021-02-13T15:14:31+5:30
Son Death when try to kill his father: बालाजी पेठेत मद्याच्या नशेत घडली घटना, मुलगा सौरभ याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता.
जळगाव : मद्यप्राशन केल्यामुळे खडसावल्याचा राग आल्याने मुलाने घरातील चाकू घेऊन बापावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात बचाव करताना हिसकावलेला चाकू मुलाच्याच पोटात घुसल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता बालाजी पेठेत घडली. सौरभ सुभाष वर्मा (२६) असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील रामपेठेतील बालाजी मंदीर परिसरात दारूड्या मुलासोबत झालेल्या भांडणात बापाकडून चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. बापाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून शनीपेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष वर्मा हे सोने, चांदीचे व्यापारी असून शनी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालाजी पेठेत ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत. मुलगा सौरभ याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. शुक्रवारी रात्री १० वाजता सौरभ दारू पिऊन घरी आला. वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांनी त्याला खडसावले, त्याचा त्याला राग आला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सौरभने घरातील चाकू आणून वडिलांना धमकावले. दारुच्या नशेत काही याच्याकडून चाकू कोणालाही लागू शकतो, यामुळे वडिलांनी त्याच्या हातातील चाकू हिसकावला असता सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला व त्याचवेळी वडिलांच्या हातातील चाकू सरळ सौरभच्या पोटात भोसकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने जखमी सौरभला खासगी रुग्णालय व त्यांनरत जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी रात्री ११ वाजता मयत घोषीत केले.
घटनेची वाच्यता झाली अन् वडिलांना घेतले ताब्यात
या घटनेची वाच्यता झाल्यानंतर शनी पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, कावडे, दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, संजय शेलार, अभिजित सैदाणे, अमित बाविस्कर, राहूल घेटे, राहूल पाटील, विजय निकम व अनिल कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळ व जिल्हा रुग्णालयात जावून घटनाक्रम जाणून घेत सौरभचे वडील सुभाष वर्मा यांना ताब्यात घेतले. दरम्यान, शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.