Kolhapur News: कोल्हापूर: पोलीस लाईनमध्ये महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 05:50 PM2022-04-17T17:50:55+5:302022-04-17T17:51:18+5:30
Kolhapur Crime News: शनिवारी त्या पुण्याला पीएसआय परीक्षा देऊन रात्री घरी परतल्या. त्यावेळी पती विकास मित्राच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच योगिणीने वडीलांशी फोनवर चर्चा केली.
कमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुल होत नसल्याने पती व सासूकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगिणी सुकुमार पोवार (वय ३२ रा. पोलीस लाईन कसबा बावडा. मुळ गाव- पिंपळगाव, ता कागल) असे त्यांचे नाव आहे. कसबा बावडा पोलीस लाईनमधील रुम नंबर १८ मध्ये ही घटना रविवारी दुपारी उघडकिस आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, योगिणी पोवार यांचे सासरचे नाव योगिणी विकास कांबळे असे आहे. २०११ मध्ये त्या कोल्हापूर पोलीस दलात भरती झाल्या. सद्या त्या पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. पाच वर्षापूर्वी त्यांचा मुंबईस्थित मामेभाऊ विकास कांबळे (मुळ रा. भाटणवाडी, ता. करवीर) याच्याशी विवाह झाला. विकास हे सध्या खासगी कंपनीत नोकरीस आहेत.
काही दिवसांपासून त्यांचा पती विकास कांबळे याच्याशी वारंवार वाद होत होता. शनिवारी त्या पुण्याला पीएसआय परीक्षा देऊन रात्री घरी परतल्या. त्यावेळी पती विकास मित्राच्या लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीच योगिणीने वडीलांशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घरात लोखंडी ॲंगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली.
घटनास्थळी ‘सुसाईड नोट’
आत्महत्या करण्यापूर्वी योगिणी पोवार यांनी घरी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. मुल होत नसल्याने पती व सासूकडून वारंवार मानसिक व शारिरिक छळ होत आहे, या त्रासाला कंटाळून जीवन यात्रा संपवत असल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिने रविवारी घेतली होती रजा
रविवारी सकाळी वडिलांसोबत लग्नाला बाहेरगावी जाणार असल्याने त्यांनी किरकोळ रजा घेतली होती. लग्नाला जाण्यासाठी तिचे वडील सुकुमार पोवार हे सकाळपासून तिला फोन करत होते, फोन न उचलल्याने ते मित्रासह थेट तिच्या पोलीस लाईनमधील घरी पोहचले. त्यावेळी त्यांच्या घरचा दरवाजा आतून बंद होता. शेजारील महिला पोलिसाच्या मदतीने त्यांनी घराची खिडकी उघडून पाहिली, त्यावेळी आतमध्ये त्याचा मृतदेह लटकत असल्याचे दिसले.