घर, दागिने, फॅक्ट्री सर्व ठेवलं गहाण, १९ कोटींचं कर्ज; संपूर्ण कुटुंबाने का उचललं टोकाचं पाऊल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:08 IST2025-03-02T12:07:53+5:302025-03-02T12:08:49+5:30
डे कुटुंबातील वाचलेल्या सदस्यांच्या जबाबांवरून आणि तपासावरून पोलिसांना असं आढळून आलं की, आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने हे पाऊल उचलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता.

घर, दागिने, फॅक्ट्री सर्व ठेवलं गहाण, १९ कोटींचं कर्ज; संपूर्ण कुटुंबाने का उचललं टोकाचं पाऊल?
गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरात चर्चेत असलेल्या 'कोलकाता डे फॅमिली सुसाईड केस'मध्ये पोलिसांनी कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा का प्लॅन केला होता याचं कारण शोधून काढलं आहे. डे कुटुंबातील वाचलेल्या सदस्यांच्या जबाबांवरून आणि तपासावरून पोलिसांना असं आढळून आलं की, आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने हे पाऊल उचलण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता.
तपासादरम्यान पोलिसांना असं आढळून आलं की, डे भावंडांनी ६ वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय संस्थांकडून १५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याशिवाय त्यांनी काही लोकांकडून ४ कोटी रुपये उधार घेतले होते. त्यांनी त्यांचं टंगारा हाऊस आणि फॅक्ट्री गहाण ठेवली होती. बोलपूरमध्ये त्याची एक प्रॉपर्टी होती, तीही ते विकण्याचा प्रयत्न करत होते. घरात असलेले दागिनेही १९ कोटी रुपये जमा करण्यासाठी गहाण ठेवण्यात आले होते. कामगारांना पगार देण्यासाठी दागिने गहाण ठेवण्यात आले. आणखी एक प्रॉपर्टी होती, तीही गहाण ठेवली होती.
पोलिसांना असं आढळून आलं की, डे भावंडांनी गेल्या वर्षी कोलकाता महानगरपालिकेकडून (केएमसी) त्यांचं ट्रेड लायसन्सही काढून घेतलं होतं आणि बोलपूरमधील त्यांचा सिल्क एक्सपोर्ट बिझनेस बंद केला होता. तपासात असं दिसून आलं की, डे कुटुंबाचे वाईट दिवस खूप आधीपासून सुरू झाले होते, परंतु डिसेंबर २०२३ पासून आर्थिक संकट तीव्र झाले. युरोपमधील निर्यातीत घट आणि त्यांच्या काही जुने वेंडर्स आणि पार्टनर्स बाहेर पडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. सतत तोटा होत असतानाही, डे कुटुंबाने त्यांचे खर्च कमी केले नाहीत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रणय डे हे त्यांची पत्नी सुदेशना आणि मुलगा प्रतीप डे यांच्यासोबत टांगरा येथील अटल सूर लेनमध्ये राहत होते. त्यांचा धाकटा भाऊ प्रसून कुमार डे देखील त्यांची पत्नी रोमी आणि मुलगी प्रियंवदा यांच्यासोबत त्याच घरात राहत होते. आर्थिक अडचणींमुळे, प्रणय डे यांनी १० फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा प्लॅन केला. त्यांनी हे त्यांचा धाकटा भाऊ प्रसुनला सांगितलं. दोन्ही भावांनीही हा निर्णय त्यांच्या पत्नींना सांगितला.
१७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी खीरीमध्ये ब्लड प्रेशर आणि झोपेची औषधं मिसळण्यात आली. दुसऱ्या दिवशी, प्रसुनची मुलगी प्रियंवदा हिचा अतिसेवनामुळे मृत्यू झाला पण बाकीचे जिवंत होते. १८ फेब्रुवारी रोजी, चारही लोकांनी आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील महिला हे करू शकत नव्हत्या, म्हणून प्रसून डे यांनी प्रथम त्यांची पत्नी रोमी आणि नंतर त्यांची वहिनी सुदेष्णा यांच्या हाताची नस कापली. यानंतर रात्रीच्या वेळी तिघेही गाडीने निघाले आणि ईएम बायपासवर त्यांचा अपघात झाला. मात्र, या अपघातात तिघेही जण बचावले. सध्या तिघांवरही उपचार सुरू आहेत.