Sanjay Roy : "रक्ताच्या थारोळ्यात पडलेली डॉक्टर, मी घाबरून पळून गेलो"; आरोपी संजय रॉयचा नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:18 AM2024-09-04T11:18:24+5:302024-09-04T11:38:12+5:30
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय याने आता नवा दावा केला आहे. संजयने त्याची वकील कविता सरकार यांना सांगितलं आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याला यात अडकवलं जात आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने आता नवा दावा केला आहे. संजयने त्याची वकील कविता सरकार यांना सांगितलं आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याला यात अडकवलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कविता सरकार म्हणाल्या की, पॉलीग्राफ टेस्टच्या वेळीही संजयने आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं.
महिला डॉक्टरचा खुनी आपण नाही, असंही त्याने म्हटलं आहे. तिचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून तो पळून गेला असल्याचं सांगितलं. पॉलीग्राफी टेस्टदरम्यान संजय रॉयला दहा प्रश्न विचारण्यात आले होते, ज्यात ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्यानंतर पुढे काय केलं? हा प्रश्नही होता. त्याने सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रश्न चुकीचा आहे, कारण त्याने तिची (ट्रेनी डॉक्टर) हत्या केलेली नाही.
संजयने पॉलीग्राफ टेस्टमध्ये दावा केला आहे की, हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना ती बेशुद्ध पडली होती. ९ ऑगस्ट रोजी सेमिनार हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पाहिल्याचं संजयने सांगितलं. वृत्तपत्रानुसार, संजय रॉयने दावा केला की, डॉक्टरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून तो घाबरून गेला आणि खोलीतून बाहेर पळाला.
वृत्तपत्राशी बोलताना आरोपी संजय रॉयच्या वकिलाने सांगितलं की, जर एखाद्याला त्या खोलीत प्रवेश करणे इतकं सोपं होतं, तर संजय व्यतिरिक्त कोणीही तेथे जाण्याची शक्यता आहे. आपण पीडितेला ओळखत नसून फसवलं जात असल्याचा दावाही संजय रॉयने केला. आपण निर्दोष असल्यास पोलिसांना का कळवलं नाही असं विचारलं असता, त्याच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही याची भीती वाटत असल्याचं संजयने सांगितलं.