कोलकाता निर्भया प्रकरण : आरोपी संजय रॉय माणूस नव्हे तर शैतान, जनावर; CBI चा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:48 AM2024-08-22T10:48:25+5:302024-08-22T10:54:24+5:30
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : सीबीआयने तयार केलेल्या सायकोएनालिटिक प्रोफाइलमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. साइकोएनालिस्ट्सच्या टीमला चौकशीदरम्यान ३१ वर्षीय संजयच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसला नाही.
कोलकात्याच्या आरजी आर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. यातील आरोपी संजय रॉय हा 'सेक्सुअल परवर्ट' म्हणजेच एक विकृत आणि जनावरासारखी प्रकृती असलेला आहे. सीबीआयने तयार केलेल्या सायकोएनालिटिक प्रोफाइलमध्ये याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. साइकोएनालिस्ट्सच्या टीमला चौकशीदरम्यान ३१ वर्षीय संजयच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चाताप दिसला नाही. गुन्हाच्या ठिकाणी नेमकं काय झालं हे सांगत त्याने आपली बाजू मांडली.
कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये सिव्हिल वॉलेंटियर म्हणून तैनात असलेल्या संजय रॉयने गुन्ह्याच्या रात्री दोन रेड लाईट एरियाला भेट दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलीस सूत्रांनी सांगितलं की, संजय रॉय ८ ऑगस्टच्या रात्री रेड लाईट एरिया सोनागाछी येथे गेला होता. त्याने दारू प्यायली आणि एकापाठोपाठ दोन रेड लाईट एरियात गेला. यानंतर मध्यरात्रीनंतर तो रुग्णालयात गेला.
सीबीआयच्या तपासात सहभागी झालेल्या तज्ज्ञांनीही संजय रॉयच्या वक्तव्याची चौकशी केली. जेणेकरून कोणताही पुरावा पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक पुराव्याशी जोडता येईल. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, रॉयची गुन्हेगारी स्थळी उपस्थितीची टेक्निकल आणि सायंटिफिक पुराव्यांद्वारे पुष्टी आहे, परंतु डीएनए चाचणीच्या निकालांबद्दल ते काहीही सांगू शकत नाहीत. सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेण्यापूर्वी, कोलकाता पोलिसांनी सांगितलं होतं की पीडितेच्या नखांमध्ये सापडलेल्या रक्त आणि त्वचेच्या खुणा रॉयच्या हातावरील जखमांशी जुळतात.
सीबीआय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंतच्या तपासाचा स्टेटस रिपोर्ट सादर करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने सीबीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, आरजी कारकडून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉय ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चेस्ट डिपार्टमेंट वॉर्डजवळ दिसला. ट्रेनी डॉक्टर त्यावेळी वॉर्डमध्ये इतर चार ज्युनिएर डॉक्टरांसह होती. ती जाण्याआधी रॉय काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत होता.
चौकशीदरम्यान, रॉयने दावा केला की, तो संध्याकाळी वॉर्डमध्ये दाखल झाला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ट्रेनी डॉक्टर इतर ज्युनिअर डॉक्टरांसोबत डिनरसाठी वॉर्डमधून बाहेर पडली आणि ९ ऑगस्ट रोजी रात्री एकनंतर सेमिनार हॉलमध्ये परतली. २.३० च्या सुमारास एक ज्युनिअर डॉक्टर हॉलमध्ये आला आणि त्याने तिच्याशी चर्चा केली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे चार वाजता रॉय पुन्हा रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश करताना दिसत आहेत. यानंतर तो तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला, जिथे ट्रेनी डॉक्टर झोपली होती. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर हत्या केली. सीबीआयने संजय रॉयची 'पॉलीग्राफ टेस्ट' करण्याची परवानगी घेतली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.