कोलकाता निर्भया प्रकरण : २:४५ पर्यंत 'ती' जिवंत होती, भावाला केलेला मेसेज; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:39 PM2024-08-26T16:39:35+5:302024-08-26T16:40:20+5:30
Kolkata Doctor Case : कोलकाता हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टर ९ ऑगस्टला रात्री २:४५ पर्यंत जिवंत होती. एजन्सींकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून याची पुष्टी झाली आहे. त्या रात्री तरुणीच्या चुलत भावाने तिला मेसेज केला होता, २.४५ च्या सुमारास तिने रिप्लाय दिला होता. पुराव्यानुसार, तरुणीच्या मोबाईलवरून एक मेसेज पाठवण्यात आला होता, ज्यावरून ती जिवंत असल्याचं सूचित होतं. हा मेसेज एक महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज तरुणीने स्वतः पाठवला होता की तिचा फोन अन्य कोणी वापरला होता, याचाही तपास करत आहे. मात्र, हा मेसेज तिच्याच फोनवरूनच पाठवण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात, तांत्रिक पुराव्याची यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे, जेणेकरून घटना नेमकी कधी घडली आणि काय परिस्थिती होती हे जाणून घेता येईल. या पुराव्याच्या आधारे, एजन्सी आता पुढील तपास करत आहे.
९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर संजय रॉयला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या सुमारे १५ लोकांची चौकशी केली, ज्यात विशेषत: पहाटे ३ ते ४ दरम्यान रुग्णालयात उपस्थित असलेल्यांचा समावेश होता. ४ वाजण्याच्या सुमारास संजय रॉय सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. कोलकाता पोलीस संजय रॉयला अटक करण्यासाठी आले तेव्हा तो दारूच्या नशेत होता.
अटक केल्यानंतर संजयने पोलिसांना ‘मला फाशी द्या’ असं सांगितलं. अटकेच्या दुसऱ्या दिवशीही संजयच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप दिसत नव्हता. त्याने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार अगदी नॉर्मल राहून सांगितला, ज्यामध्ये घटनेनंतर त्याने केलेल्या कृतींचा समावेश होता. संजय त्या रात्री ऑपरेशन थिएटर का शोधत होता? याचाही तपास पोलिसांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय ऑपरेशन थिएटर समजून सेमिनार हॉलमध्ये घुसला असण्याची शक्यता आहे.
संजयने पोलिसांना रेड लाईट एरियात गेलो होतो पण पैसे नव्हते असं सांगितलं. पोलिसांना संजयच्या विधानावर संशय असून, त्या रात्री संजयच्या मनात गुन्हा करण्याची कल्पना आधीच आली असावी, असं म्हटलं जात आहे. संजय रॉयच्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या हातावर आणि मांडीवर ओरखडे आढळून आले आहेत, या गंभीर गुन्ह्याचं सत्य समोर यावं यासाठी पोलीस संजयच्या प्रत्येक विधानाचा आणि हालचालींचा सखोल तपास करत आहेत.