Sanjay Roy : "माझ्या मुलीला मारहाण केली, तिचा गर्भपात केला"; आरोपी संजय रॉयच्या सासूचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 09:58 AM2024-08-20T09:58:21+5:302024-08-20T10:09:25+5:30
Kolkata Doctor Murder Case And Sanjay Roy : ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची सासू दुर्गा देवी यांनी आता मोठा दावा केला आहे.
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची सासू दुर्गा देवी यांनी आता मोठा दावा केला आहे. संजय रॉय एकटा असं करू शकत नाही. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. दुर्गा देवी यांनी त्यांची मुलगी आणि संजय यांच्यातील नातं तणावपूर्ण असल्याचं सांगितलं.
संजय रॉयने त्यांच्या मुलीला मारहाण केली होती, ज्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. दुर्गा देवीने य़ांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या मुलीच्या लग्नानंतर सुरुवातीला पहिले ६ महिने सर्व काही ठीक होतं. मात्र जेव्हा ती ३ महिन्यांची गरोदर होती, तेव्हा त्याने तिचा गर्भपात केला. तिला मारहाण केली. त्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली."
"संजय चांगला माणूस नव्हता"
"माझी मुलगी यानंतर सतत आजारी पडू लागली, तिच्या औषधांचा सर्व खर्च मी उचलला. संजय चांगला माणूस नव्हता. त्याला फाशी द्या किंवा तुम्हाला पाहिजे ते करा. तो एकटा हे करू शकत नाही." या प्रकरणामुळे देशभरात संताप आणि निषेध व्यक्त होत आहे. लोक रस्त्यावर उतरून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.
डॉक्टरच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीत नेमकं काय होतं गुपित, २ पानं कोणी फाडली?
कोलकाता पोलिसांनी एक डायरी सीबीआयकडे सोपवली आहे. ही डायरी महिला डॉक्टरसोबत घडलेल्या घटनेमध्ये महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरच्या मृतदेहाजवळ ही डायरी सापडली आहे. पोलिसांनी सीबीआयकडे सोपवलेल्या डायरीची काही पानं फाडलेली आहेत. आता प्रश्न असा आहे की, डॉक्टरांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या डायरीत नेमकी काय गुपितं लिहिली होती? डायरीची पानं फाडण्यामागचं कारण काय?
ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांकडे साधारणपणे डायरी असते असं सांगितलं जात आहे. ज्यावर औषधांची नावं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. परंतु मृत डॉक्टरची डायरी फाडलेली आढळल्याने पुराव्याशी छेडछाड झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ठळक झाला आहे. मात्र, सीबीआय डायरीच्या अँगलबाबत जागरूक असून प्रत्येक बाजूने तपास करत आहे.