1 घर, 2 मृतदेह आणि मर्डर मिस्ट्री; बहिणीच्या आत्म्याला जेवण देणारा भाऊ, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 10:26 AM2023-01-25T10:26:17+5:302023-01-25T10:37:07+5:30

घरात एक मृतदेह पलंगावर पडला होता तर दुसरा जळालेला मृतदेह बाथरूममध्ये होता.

kolkata flat dead bodies skeleton bones seizure death mystery soul food suspected brother investigation | 1 घर, 2 मृतदेह आणि मर्डर मिस्ट्री; बहिणीच्या आत्म्याला जेवण देणारा भाऊ, नेमकं काय घडलं?

1 घर, 2 मृतदेह आणि मर्डर मिस्ट्री; बहिणीच्या आत्म्याला जेवण देणारा भाऊ, नेमकं काय घडलं?

Next

अनेकवेळा अशी प्रकरणे आपल्यासमोर येतात, जी सर्वसामान्यांना तर आश्चर्यचकित करतातच, पण पोलीस आणि कायद्यासाठीही कोड बनतात. असाच एक प्रकार कोलकाता शहरात 8 वर्षांपूर्वी समोर आला होता. ज्यात पोलिसही गोंधळले होते. 77 वर्षीय अरबिंदो डे त्यांचा मुलगा पार्थ डे आणि मुलगी देबजानीसोबत राहत होते. तर अरविंदांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पार्थ अभ्यासात आणि लेखनात चांगला होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो एका मोठ्या कंपनीत काम करायचा. 

देबजानी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असे. त्याच्या कुटुंबात दोन पाळीव कुत्रेही होती. ज्याच्यावर देबजानी खूप प्रेम करत असे. 11 जून 2015 ला रॉबिन्सन लेनच्या फ्लॅटमधून धूर निघत असल्याची माहिती कुणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. ज्या घरातून धूर निघत होता, ते घर अरबिंदो डे यांचे होते. पोलीस तात्काळ त्या फ्लॅटवर पोहोचले.

बाथरूममध्ये आढळून आला जळालेला मृतदेह 

पोलीस अरबिंदोच्या फ्लॅटमध्ये शिरले तेव्हा घरातून उग्र वास येत होता. घरातून धूर निघत असलेल्या ठिकाणी पोलीस आधी पोहोचले. पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य भयानक होते. तिथे एका माणसाचा जळालेला मृतदेह पडला होता आणि ज्या व्यक्तीला जाळून मारण्यात आले ते म्हणजे 77 वर्षांचे अरबिंदो डे.

बेडरूममध्ये सांगाडा सापडला

अरविंदोने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले. मात्र घरात उपस्थित असलेला त्यांचा मुलगा पार्थ डे याला याबाबत काहीही सांगता आले नाही. तो स्वतःही हैराण आणि अस्वस्थ झाला. पोलिसांनी जळालेला मृतदेह बाथरूममधून बाहेर काढला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवणार असतानाच फ्लॅटच्या दुसऱ्या खोलीत बेडवर पडलेला सांगाडा पाहून धक्काच बसला.

पार्थची बहीण देबजानीचा सांगाडा 

एकाच घरात दोन मृतदेह असण्याचा अर्थ काय, हे पोलिसांना समजू शकले नाही. अधिक तपासात पोलिसांना कळले की हा मृतदेह पार्थची 50 वर्षांची बहीण देबजानी हिचा आहे. तो सांगाडा सदृश मृतदेह सात ते आठ महिन्यांचा होता.

दोन पोत्यांमध्ये हाडे भरली

पोलिसांसमोर विचित्र दृश्य होते. घरात सांगाडा बनलेला एक मृतदेह पलंगावर पडला होता तर दुसरा जळालेला मृतदेह बाथरूममध्ये होता. मात्र त्यावेळी घराची झडती घेतली असता दोन पोत्यांमध्ये काही हाडेही सापडल्याने पोलिसांना आश्चर्य वाटले. ती हाडे कुठल्यातरी प्राण्याची असल्यासारखी वाटत होती. पोलिसांनी ती हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठीही पाठवली.

आईच्या निधनानंतर पार्थने सोडली नोकरी 

आता त्या घरात पोलिसांसमोर फक्त एकच व्यक्ती जिवंत होती, ती म्हणजे पार्थ डे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर आणि पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी पार्थ डे याची कोठडीत चौकशी केली. कारण या संपूर्ण प्रकरणाचे कोडे सोडवणारा तो एकमेव माणूस होता. पार्थने पोलिसांना सांगितले की, सुमारे 6 वर्षांपूर्वी तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करायचा. मात्र आईच्या निधनानंतर पार्थने कंपनी सोडली होती. तेव्हापासून तो घरीच राहत होता.

देबजानीचे डिसेंबर 2014 मध्ये झाले निधन 

पार्थने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याची बहीण देबजानीला त्यांच्या पाळीव कुत्र्यांची खूप आवड होती. पण एक एक करून ती दोन्ही कुत्रे मेले. यामुळे देबजानीला मोठा धक्का बसला आणि तिने दु:खामुळे खाणे बंद केले. त्यामुळे तिची प्रकृती ढासळू लागली. तिला उपचारही घ्यायचे नव्हते. त्याचा परिणाम असा झाला की देबजानीने जगाचा निरोप घेतला.

बहीण जिवंत आहे असे समजून खायला घालायचा पार्थ 

अधिक चौकशी आणि चौकशीत पोलिसांना कळले की पार्थ डेचे त्याची बहीण देबजानी हिच्यावर खूप प्रेम होते. यामुळेच त्यांनी बहिणीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. ती जिवंत असल्याप्रमाणे तो तिचा मृतदेह बेडवर ठेवायचा. ज्या पलंगावरून देबजानीचा सांगाडा सापडला, त्या पलंगावर बरेच अन्न पडलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबत पोलिसांनी पार्थला विचारले असता त्याने सांगितले की, तो आपल्या बहिणीच्या आत्म्याला जेवण द्यायचा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: kolkata flat dead bodies skeleton bones seizure death mystery soul food suspected brother investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.